मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण : पोलिस अधिकारी सचिन वाझे यांची गुन्हे शाखेतून उचलबांगडी
मुंबई : मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांची गुन्हे शाखेतून उचलबांगडी करण्यात आली आहे. सचिन वाझेंवर हिरेन यांच्या पत्नीनं खुनाचा आरोप केला होता शिवाय वाझेंना पाठिशी घालण्याचं कारण काय, असा सवाल भारतीय जनता पक्षाकडून उपस्थित करण्यात येत होता. अखेर या प्रकरणी ठाकरे सरकारला बॅकफूटवर जावं लागलं. वाझे यांची गुन्हे शाखेतून बदली करण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान परिषदेत केली.
हिरेन यांच्या अंगावरील दागिने गायब
मनसुख हिरेन जेव्हा घरातून बाहेर पडले होते. तेव्हा त्यांच्या गळ्यात दीड तोळ्याची सोन्याची चैन होती. हातात सोन्याची अंगठी होती, काही रोख रक्कम व पाच ते सहा कंपनीचे डेबिट व क्रेडिट कार्ड होते. जेव्हा त्यांचा मृतदेह सापडला होता तेव्हा घटनास्थळी या सर्व गोष्टी गायब होत्या, त्यामुळे मनसुख यांची हत्या झाली असावी ? असा संशय वाढत चालला आहे. मनसुख हिरेन यांच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार, मनसुख हिरेन यांचा खून झाला असावा, तसेच तो सचिन वाझे यांनी केला असावा. हिरेन यांना सचिन वाझे आधीपासून ओळखत होते. तसेच हिरेन यांची कार चार महिन्यांपासून सचिन वाझेंकडे होती, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.







