भुसावळातील दहा वेन्टीलेटर डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात हलवले
भुसावळ : ग्रामीण रुग्णालय व ट्रामा सेंटर डीसीसीएचमध्ये शुक्रवारी रात्री दोन वेन्टीलेटर चाचणीसाठी सुरू करण्यात आले होते मात्र तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने या वेन्टीलेटरचा वापर होण्यासाठी संपूर्ण दहा वेन्टीलेटर डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या ठिकाणी प्रशासनाकडून 30 खाटांचे जंम्बो आयुसीयु तयार केले जात आहे. तेथे या वेन्टीलेटरचा वापर होणार आहे.
वेन्टीलेटर वापराअभावी धूळखात
कोरेानाच्या पहिल्या लाटेच्या वेळी अत्यावश्यक गरज म्हणून भुसावळ ग्रामिण रुग्णालयास दहा वेन्टीलेटर उपलब्ध करून देण्यात आले होते मात्र ते धूळखात पडून होते. आमदार संजय सावकारे, भाजप वैद्यकिय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नी. तू. पाटील यांनीही जिल्हाधिकार्यांकडे वेन्टीलेटर चालविण्यासाठी तज्ज्ञ टेक्निशियन मिळावा, म्हणून पाठपुरावा केला. मात्र अद्यापही डॉक्टर मिळाले नाही. शुक्रवारी रात्री चाचणीसाठी दोन वेन्टीलेटर सुरू करण्यात आले मात्र डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात 30 खाटांचे वेन्टीलेटर आयसीयु सुरु केले जाणार आहे. यामुळे शनिवारी दुपारी भुसावळ डीसीसीएचमधून हे वेन्टीरेटर तेथे हलविण्यात आले आहे. भुसावळात तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने धुळखात पडलेल्या या वॅन्टीरेटरचा वापर होणार आहे. दरम्यान शुक्रवारी रात्री दोन आमदार संजय सावकारे, प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, डॉ. नी. तू. पाटील यांच्या उपस्थितीत दोन वॅन्टीरेटर कार्यान्वित करण्यात आले. ते देखील काढून डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.




