‘साप्ताहिक भुसावळ जंक्शन’ बनेल सर्वसामान्य नागरिकांचा आवाज : भुसावळात स्वागत अंकांच्या विमोचन प्रसंगी मान्यवरांचा सूर
भुसावळ (शुक्रवार, 28 ऑगस्ट 2026) : भुसावळ आणि संपूर्ण खान्देशातील स्थानिक प्रश्न, सामाजिक घडामोडी तसेच सर्वसामान्य नागरिकांचा आवाज निर्भीड आणि वस्तुनिष्ठपणे मांडण्यासाठी ‘भुसावळ जंक्शन’च्या माध्यमातून एक नवे व्यासपीठ उपलब्ध झाले असून हे साप्ताहिक वृत्तपत्र सर्वसामान्य नागरिकांचा आवाज बनेल, असा सूर येथे मान्यवरांनी व्यक्त केला. रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर ‘भुसावळ जंक्शन’ या साप्ताहिक वृत्तपत्राच्या पहिल्या स्वागत अंकाचे विमोचन राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री व भुसावळचे आमदार संजय सावकारे व मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवार, 28 रोजी दुपारी 12 वाजता करण्यात आले. या सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या मान्यवरांची विचार मंचावर उपस्थिती
भुसावळ विभागाचे पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, यावल नगराध्यक्षा छायाताई पाटील, भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, यावलचे नगरसेवक अतुल पाटील, नगरसेवक राजेंद्र आवटे, पुरुषोत्तम नारखेडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानदेव झोपे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.




स्थानिक प्रश्नांना व्यासपीठ
मान्यवरांनी बोलताना पत्रकारिता हा लोकशाहीचा महत्त्वाचा आधारस्तंभ असल्याचे नमूद करीत समाजातील विविध घटकांचे प्रश्न वस्तुनिष्ठ, निर्भीड आणि प्रभावीपणे मांडण्याची जबाबदारी माध्यमांची असल्याचे सांगण्यात आले. भुसावळसह खान्देशातील जनतेचा आवाज अधिक ताकदीने पुढे नेण्याचे कार्य ‘भुसावळ जंक्शन’ हे साप्ताहिक करेल, असा विश्वास यावेळी सर्वच मान्यवरांनी आपल्या बोलण्यातून व्यक्त केला.
दोघा मान्यवरांचा ‘विशेष सन्मान चिन्हाने’ गौरव
प्रसंगी शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेख कार्य करणार्या सेवानिवृत्त प्राचार्य प्रा.डॉ.दिलीपकुमार ललवाणी यांना विशेष सन्मानचिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले तसेच ‘उजेड पेरणारी माणसे’ या पुस्तकाचे लेखक व दैनिक दिव्य मराठीचे ज्येष्ठ पत्रकार आनंदा पाटील यांचाही विशेष सन्मानचिन्हाने गौरव करण्यात आला. हा सन्मान भुसावळातील ज्येष्ठ पत्रकार संजयसिंग चव्हाण यांनी स्वीकारला. काही वर्षांपूर्वी नेपाळ दुर्घटनेतील जखमींच्या बचाव कार्यासाठी धावलेल्या भुसावळातील प्रशांत पाटील, मुरलीधर उर्फ गोलू पाटील, परीक्षीत बर्हाटे, केदार ओक आदींचा विशेष सन्मानचिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. हा सन्मान परीक्षीत बर्हाटे यांनी स्वीकारला.
‘भुसावळ जंक्शन’वर शुभेच्छांचा वर्षाव
‘भुसावळ जंक्शन’च्या माध्यमातून स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत जनतेशी जोडलेली पत्रकारिता करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. साप्ताहिकाच्या पुढील वाटचालीसाठी उपस्थित मान्यवरांनी संपादक गणेश वाघ यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्रा.डॉ.नरेंद्र महाले तर आभार डॉ.जगदीश पाटील यांनी मानले.

