वरणगाव ग्रामीण रुग्णालयातील रीक्त पदांबाबत विरोधी पक्ष नेत्यांना साकडे
वरणगाव : वरणगाव ग्रामीण रुग्णालयातील दोन वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, परीचारिका व लॅब असिस्टंट वॉर्ड बॉय आदी पदे रीक्त असल्याने ही पदे भरण्याबाबत माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या नेतृत्वात भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, नगरसेविका माला मेढे, सरचिटणीस गोलू राणे, कुंदन माळी, भाजयुमो शहराध्यक्ष संदीप भोई, महिला मोर्चा अध्यक्षा प्रणिता पाटील -चौधरी यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना साकडेघातले. निवेदनाच्या प्रती माजी मंत्री गिरीश महाजन, आमदार संजय सावकारे, खासदार रक्षा खडसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोजीराव चौहान यांनाही देण्यात आल्या.
रीक्त पदे तातडीने भरावीत
वर्षभरापासून कोरोनाच्या महामारीने वरणगाव दहशतीखाली असतांना आरोग्य विभाग रीक्त पदे भरत नसल्याने हजर व प्रामाणिक कर्मचारी यांच्या वर कामाचा ताण प्रचंड येत आहे. सरकारकडे पाठपुरावा सुरू केला मात्र नकारात्मक उत्तरे दिली जात असल्याने राज्याचे विरोधी पक्ष नेते असल्याने वरणगावची परीस्थिती सरकारच्या लक्षात आणून देउन आरोग्य मंत्री व आरोग्य संचालक यांना त्वरीत वरणगाव ग्रामीण रुग्णालयातील रीक्त पदे भरण्याबाबत आपल्या स्तरावरून दखल घ्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

