प्रा.डॉ.डी.एम.ललवाणी यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर
भुसावळ : राजनंदिनी बहुउद्देशीय संस्थेतर्फे प्रा.डॉ.डी.एम.ललवाणी यांना ‘जीवन गौरव पुरस्कार 2020-21’ जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या जन्मगावी कळमसरे येथे करण्यात येईल. प्रा.डॉ.डी.एम.ललवाणी हे पी.के.कोटेचा महिला महाविद्यालयातील वाणिज्य शाखेमधील सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. त्यांनी उपप्राचार्य व प्रभारी प्राचार्य पदाचीदेखील जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली होती. त्यांचे शैक्षणिकच नव्हे तर सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक, क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे. ते भारतीय जैन संघटनेचे माजी जिल्हाउपाध्यक्ष आहेत. त्यांनी कपूरचंद कोटेचा स्मृती व्याख्यानमालेच्या सलग 16 वर्ष आयोजनात मुख्य भूमिका बजावली. ते भुसावळ येथील जैन सोशल ग्रुपचे माजी सल्लागार आहेत. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण लवकरच करण्यात येईल, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा संदीपा ज्ञानेश्वर वाघ यांनी दिली.





