अज्ञात वाहनाची रुग्णवाहिकेला धडक : सुदैवाने प्राणहानी टळली
भुसावळ : जिल्हा परीषद सदस्य तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांनी मतदारसंघासाठी दिलेल्या रुग्णवाहिकेला अज्ञात वाहनाने कट मारल्याने अपघात झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास वाघूर नदीपुलाजवळ घडली. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही तर मृतदेह घेण्यासाठी ही रुग्णवाहिका जात असल्याचे सांगण्यात आले. सूत्रांच्या माहितीनुसार, साकेगाव ग्रामपंचायतीची रुग्णवाहिका शव घेवून साकेगावकडे येत असताना नशिराबादजवळ बंद पडल्याने पाटील यांची रुग्णवाहिका (एम.एच.19 जे 2488) मदतीसाठी नशिराबादकडे निघाली असतानाच अज्ञात वाहनाने वाघूर नदीपुलाजवळ रुग्णवाहिकेला कट मारण्याच्या प्रयत्नात धडक दिली. या अपघातात रुग्णवाहिकेचा एका बाजूच्या भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या रुग्णवाहिकेत चालकासह दोघे होते मात्र सुदैवाने त्यांना कुठलीही दुखापत झाली नाही तसेच शुक्रवारीच ही रुग्णवाहिका मतदारसंघासाठी देण्यात आल्याचे जि.प.सदस्य रवींद्र पाटील यांनी सांगितले. पोलिसात मात्र या अपघाताची नोंद नसल्याचे सूत्रांनी सांगितले.





