मुक्ताईनगरात ऑक्सीजन तुटवड्याने रुग्णांना जळगावी हलवले


मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयातील गंभीर प्रकार : आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिला 2 रोजी उपोषणाचा इशारा

मुक्ताईनगर : शहरातील जिल्हा उप रुग्णालयात ऑक्सीजनचा तुटवडा भासल्याने 28 ते 29 रोजीच्या दुपारदरम्यान तब्बल 12 रुग्णांना जळगावी हलवण्याची नामुष्की ओढवल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी चांगलाच संताप व्यक्त केला. गेल्या पंधरवड्यातदेखील अशीच घटना घडल्याने यापुढे असा प्रकार न होण्यासाठी जिल्हा प्रशासन व संबंधीत यंत्रणेने दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, रुग्णांची वाढत्या संख्या पाहता व जिल्हा प्रशासनाकडून पुरेसा ऑक्सिजन पुरवठा होत नसल्याने आमदार चंद्रकांत पाटील यांनी संतप्त होत रविवार, 2 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा जिल्हा प्रशासन व विभागीय आयुक्त यांना ई मेलद्वारे दिला आहे.

ऑक्सीजन तुटवड्याने संताप
शहरात जळगाव जिल्ह्यातील एकमेव असे अत्याधुनिक साधन सामग्री उपलब्ध असलेले जिल्हा उप रुग्णालय आहे. या ठिकाणी आजूबाजूच्या पाच ते सहा तालुक्यांमधून कोरोनाबाधीत रुग्ण उपचारासाठी येतात शिवाय जास्तीत-जास्त प्रमाणात रुग्ण बरे होऊन घरीदेखील जातात त्यामुळे जास्तीत-जास्त रुग्णांना ऑक्सीजनची गरजही भासते. या दखल घेत आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्वतः कडून एक व लोकवर्गणीतून चार असे पाच ड्युरोऑक्सीजन सिलेंडर मागवले आहे. येथे सर्व येथे उपलब्ध असतानादेखील जिल्हा प्रशासन मात्र ऑक्सिजन पुरवठा वेळोवेळी व पाहिजे तितका करत नसल्याने एक प्रकारे रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू आहे. गुरुवार, 29 रोजी रात्री ऑक्सिजन सिलेंडर संपल्यामुळे एकच तारांबळ उडाली. आमदार चंद्रकांत पाटील, तहसीलदार श्वेता संचेती आणि तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर योगेश राणे यांना रुग्णांचे जीव वाचवण्याकरिता तारेवरची कसरत केली. अतिगंभीर परीस्थितीत असलेले रुग्ण व ज्यांना जास्त प्रमाणात ऑक्सिजन लागत होता अशा रुग्णांना खाजगी रुग्णवाहिका व मिळेल त्या रुग्णवाहिकेने
डॉ.उल्हास पाटील कोविड केअर सेंटरला हलविलले. स्वतः आमदार पाटील या ठिकाणी रात्री तीन वाजेपर्यंत उपस्थित होत व सोबत डॉ.राणे व तहसीलदार देखील होत्या.





आमदार चंद्रकांत पाटील यांचा उपोषणाला बसण्याचा इशारा
आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाधिकारी, जळगाव यांना गुरुवारी रात्री वारंवार संपर्क केला असता जिल्हाधिकारी मुख्यमंत्री यांच्यासोबत व्हीसी मध्ये बिझी असल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही तसेच शुक्रवारीदेखील ऑक्सिजनची काही एक व्यवस्था होत नसल्याने संतप्त होऊन आमदार चंद्रकांत पाटील यांनी 2 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव समोर उपोषणाला बसण्याचा इशारा जिल्हा प्रशासन व विभागीय आयुक्त यांना ई-मेल द्वारे दिला आहे.

जिल्हा बँक अध्यक्षांची भेट
उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सीजन तुटवड्यानंतर जिल्हा बँक अध्यक्षा अ‍ॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांच्या नातेवाईकांना धीर दिला. सिव्हिल सर्जन डॉ.एन.एस.चव्हाण यांच्या सोबत दूरध्वनीवरून चर्चा करून लवकर ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्याबाबत विनंती केली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ.योगेश राणे, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, राजु माळी, सुभाष पाटील, प्रवीण पाटील, प्रदीप साळुंखे, निलेश शिरसाट, बापु ससाणे, सुनील काटे, सुभाष खाटीक, विलास वानखेडे उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !