संतापजनक ! : कोरोनाबाधीत मयत शिक्षकाच्या खिशातून लांबवली रक्कम
धुळ्यातील श्री गणेशा रुग्णालयातील संतापजनक प्रकार : पाच वॉर्ड बॉयविरोधात गुन्हा
धुळे : धुळ्यातील वाडीभोकर रोडवरील खाजगी श्री गणेशा हॉस्पीटलमध्ये शुक्रवारी घडली. शिरपूरचे शिक्षक धनराज माळी यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांचा मृत्यू ओढवल्यानंतर त्यांच्या खिशातील रोकड रुग्णालयातील वॉर्डबॉय यांनी लांबवल्याची घटना सोशल मिडीयावर घडल्यानंतर संतापजनक प्रतिक्रिया उमटल्या. या घटनेप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून रुग्णालयातील पाच वॉर्डबॉय विरोधात गुन्हा दाखल केला. दोषींवर कठोर कारवाई होण्याची मागणी आता होत आहे.
रुग्णालयातील घटना दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप
शिरपूर येथील शिक्षक धनराज माळी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला व मृतदेह ताब्यात घेत असताना नातेवाईकांनी मृत शिक्षकांचे खिसे तपासले असता त्यात त्यांनी सोबत आणलेले पैसे आढळले नाही़ तेव्हा रुग्णालयातील कर्मचार्यांची विचारपूस केली असता उडवा-उडवीची उत्तरे मिळाल्याने काहीसा तणाव निर्माण झाला व नातेवाईकांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली़ त्यात रुग्णालयात कार्यरत कर्मचारी मयताच्या खिशातील रोकड व आभूषणे काढत असल्याचे दिसून आले़ ही महिती नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला दिली असता त्यांनी घडलेला प्रकार झाकण्याचा प्रयत्न केला, असा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला. त्यानंतर नातेवाईक मयताचे मृतदेह घेवून शिरपूरला रवाना झाले़ शनिवारी यासंदर्भात रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर मयत शिक्षक धनराज माळी यांचे मित्र दीपक रमेश पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून पाच वॉर्डबॉय विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली़ तपास सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील घटनेचा तपास करीत आहेत.


