राज्यात १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणास प्रारंभ
२६ जिल्ह्यांमध्ये सायंकाळी सहापर्यंत ११ हजार ४९२ लाभार्थ्यांना दिली लस
मुंबई : राज्यात आज, १ मेपासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना लसीकरणाला सुरुवात झाली. त्यासाठी आज २६ जिल्हयांत ठराविक ठिकाणी एकूण १३२ लसीकरण सत्रे आयोजित करण्यात आले होते. सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकूण ११ हजार ४९२ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, असे आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले. आजपासून १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांच्या लसीकरणाला २६ जिल्हयांमध्ये सुरुवात झाली. उर्वरीत जिल्हयांमध्ये उद्या दि. २ मेपासून लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत उत्पादकाकडे उपलब्ध असलेल्या साठयानुसार राज्याने या वयोगटासाठी कोव्हिशिल्ड लसीचे ३ लाख डोसेस खरेदी केले आहेत.