जिल्हा महिला व बाल विकास अधिकार्यासह लेखापाल एसीबीच्या जाळ्यात
रायगड : अन्न धान्य पुरवठ्याची बिले मंजूर करण्यासाठी तब्बल चार लाख 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करीत त्यापोटी पहिल्या हप्त्यापोटी एक लाखांची लाच स्वीकारणार्या अलिबाग येथील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्यासह लेखापालासही अटक करण्यात आली. या कारवाईने खळबळ उडाली आहे. रायगड जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी उज्वला सदाशिव पाटील, कंत्राटी लेखापाल भूषण रामचंद्र घारे अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
लाचेचा मोह भोवला
सृष्टी एंटरप्राइजच्या वतीने सरकारी कृपा महिला वसतिगृह कर्जत आणि सरकारी कृष्ठरोगी भिक्षेकरी गृह कोलाड येथे अन्न धान्य पुरवण्यात आले होते. याबाबतची बिले मंजूर करण्यासाठी आरोपी उज्वला पाटील यांनी तब्बल चार लाख 10 हजार रुपयांच्या लाचेची मागणी तक्रारदार यांच्याकडे केली होती. याबाबत तक्रारदार याने अलिबागच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली होती. त्यानंतर आज दुपारी एक वाजता सापळा लावून तो यशस्वी करण्यात आला.





