‘नटरंग’फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या वडिलांवर प्राणघातक हल्ला
पुणे : ‘नटरंग’फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचे वडील मनोहर कुलकर्णी (63) यांच्यावर अजय शेगटे नामक आरोपीने मंगळवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास चाकूने हल्ला केल्याची घटना घडल्याने चित्रपत्र सृष्टीत खळबळ उडाली. या हल्ल्यात मनोहर कुलकर्णी हे किरकोळ जखमी झाले. निगडी पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. सोनाली कुलकर्णीच्या वडिलांचे पुण्यातील निगडी प्राधिकरण भागातील सेक्टर क्रमांक 25 येथे घर असून मंगळवारी आरोपी अजय शेगटे आला असता सोनालीचे आई-वडील घरात असताना त्यांनी अजयला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र माथेफिरु अजयने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. यावेळी झालेल्या झटापटीत 63 वर्षीय मनोहर कुलकर्णी किरकोळ जखमी झाले. तपासादरम्यान आरोपीकडे खोटे पिस्तूल आणि चाकू पोलिसांना आढळले आहे. कुलकर्णीच्या इमारतीतील रहिवाशांना याची माहिती मिळताच त्यांनी अजयला पकडले. त्यानंतर पोलिसांना तातडीने घटनास्थळी धाव घेत अजयला ताब्यात घेतले. हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.