कोरोना योद्ध्यांच्या विमा संरक्षणातील अडचणी सोडवा
भाजप वैद्यकीय आघाडीची मागणी ; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिले निवेदन
भुसावळ : शहीद कोरोना योद्ध्यांच्या विम्याची प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विमा प्रतिनिधी नेमावा, या मागणीसाठी भाजपच्या वैद्यकीय आघाडीने नुकतेच जळगाव जिल्हा दौर्यावर असलेले राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भुसावळ येथे निवेदन दिले. विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या हस्ते भुसावळ ग्रामीण रुग्णालयात आमदार संजय सावकारे यांच्या निधीतून रुग्णवाहिकेचे लोकार्पण झाले.
यांची होती उपस्थिती
यावेळी भाजप वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ.नि.तु.पाटील, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ.नरेंद्र ठाकूर, जळगाव महानगर अध्यक्ष डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी निवेदन दिले. त्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत असताना ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तेथे रुग्ण सेवा करणारे कंत्राटी बीएएमएस डॉक्टरांचा आधार होता. आता बंधपत्रीत एमबीबीएस डॉक्टरांना ग्रामीण भागात एक वर्ष सेवा देणे बंधनकारक असल्याने राज्यातील सुमारे 800 कंत्राटी बीएएमएस डॉक्टरांच्या नोकरीवर गदा आली आहे. त्यामुळे बीएएमएस डॉक्टरांनी कोरोना काळात केलेल्या सेवेचा सन्मान म्हणून त्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

शहिद कोरोना योद्ध्यांना विम्याचा लाभ द्या
शहीद कोरोना योद्ध्यांना लवकरात-लवकर विम्याचा लाभ मिळावा, सर्वांचा वेळ वाचावा म्हणून विमा कंपनीद्वारे प्रत्येक जिल्हास्तरावर एक विमा प्रतिनिधी नेमावा अशी मागणी केली. त्याबाबत पाठपुरावा करून असे फडणवीस म्हणाले. माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार अनुक्रमे रक्षा खडसे, उन्मेष पाटील, आमदार संजय सावकारे, डॉ.राजेंद्र फडके, माजी आमदार स्मिता वाघ, अशोक कांडेलकर उपस्थित होते.

