भुसावळातील झोपडपट्टी धारकांना न्याय मिळवून देणार
काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष आमदार नाना पटोले : भुसावळातील कार्यकर्त्यांना कानपिचक्या
भुसावळ : भुसावळातील रेल्वे हद्दीत रेल्वे प्रशासनाकडून अतिक्रमण हटवण्यात आल्याने पाच हजारावर कुटुंब बेघर झाले असून काँग्रेस त्यांच्या पाठीशी असून या कुटुंबाना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुराव करण्यात येईल व वेळ पडल्यास काँग्रेस झोपडपट्टी धारकांसाठी आंदोलन छेडेल, अशी ग्वाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी येथे दिली. रामानंद मंगल कार्यालयात पदाधिकारी-कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी कार्यकर्त्यांना कानपिचक्या देत देशातील मोदी सरकारवर टिकास्त्र सोडले.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, आमदार शिरीष चौधरी, माजी मंत्री शोभा बच्छाव, माजी आमदार रमेश चौधरी, माजी आमदार नीळकंठ फालक, प्रवक्ते अतुल लोंढे, अश्विन लोंढे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मुन्वर खान, अॅड.अविनाश भालेराव, विरेंद्र पाटील, तालुकाध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष रवींद्र निकम, जामनेर तालुकाध्यक्ष एस.टी.पाटील, संतोष सावळवे, शैलेश आहिरे, महिला आयोगाच्या माजी सदस्या जोत्स्ना विसपुते, युवक जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.



देशाच्या बिकट स्थितीला केंद्र शासन जवाबदार
पटोले म्हणाले की, देश सध्या बिकट परिस्थिती असून यास केंद्र सरकार जबाबदार आहे. यावर प्रधानमंत्री बोलण्यास तयार नाही. शेतकर्यांवर या सरकारकडून अन्याय होत आहे. शेतकरी विरोधी कायदा या सरकारने पारीत केला आहे. या तीनही कायद्याचे दहन करण्यासाठी आपण जिल्हा दौर्यावर आलो आहोत. भुसावळ मतदार संघात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. हीच परिस्थिती महाराष्ट्राच्या कान्याकोपर्यात आहे. देशाची लोकशाही व संविधान सांभाळणे ही काँग्रेसची भुमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट करत भाजपा सरकारने लागू केलेली नोटबंदी, चुकीच्या जीएसटीमुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईला गेली. याबाबत संभाव्य नुकसानाबाबत मुजोर केंद्र सरकारला त्यावेळी खासदार राहुल गांधी यांनी सरकारला सुचना केली होती. मात्र सरकारने त्यांच्या सुचनेला गांभिर्याने न घेता त्यांच्यावर ट्रोल करुन टिंगल उडवली होती मात्र सध्याची परीस्थिती सर्वांसमोर आहे.
मी नेता आहे समजू नका : सर्वच कार्यकर्ते
पक्षातील स्थानिक गटबाजीबाबत पदाधिकार्यांना सज्जड दम देत आगामी काळात कोणीही मी नेता आहे, असे समजू नये, असे पटोले यांनी सांगत माझ्यासह सर्वच जण या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. कार्यकर्ते म्हणुन काम केल्यास पक्ष मजबूत होईल असे म्हणत सर्वांनी समन्वय ठेवत एकत्र काम केले पाहिजे. कोणी स्वत:ला नेता समजत असेल किंवा गडबड करत असेल त्यांची तक्रार आपल्याकडे आल्यास त्याची गय केली जाणार नाही. माझ्याकडे कुठलीही चौकशी समिती नाही. त्यामुळे काम करतांना समन्वय ठेवा. असा सज्जड दम देत एकत्र राहण्याचे आवाहन केले.
काँग्रेसचा मूळ गाभा भुसावळात : माजी खासदार पाटील
भुसावळ, जामनेर व बोदवड तालुक्यातील जागा मित्र पक्षांकडे गेल्या आहेत मात्र त्या ठिकाणी विरोधी उमेदवारांपेक्षा अधिक मताधिक्य आपल्याला असते. भुसावळ काँग्रेसचा मूळ गाभा आहे. त्यासाठी येथे काँग्रेसला जागा लढवायची आहे. जामनेरातही काँग्रेसला जागा मिळाल्यास माजी मंत्री गिरीष महाजन यांना ही घरी पाठवावे, असे त्यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांमध्ये निराशा : माजी आमदार फालक
गेल्या 20 वर्षांपासून भुसावळची जागा मित्र पक्षांकडे गेली आहे. त्यामुळे त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्ये कमी पडत आहे. हा प्रश्न यापूर्वीही वरीष्ठांकडे मांडला होता. त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. हा विषय गांभीर्याने घेऊन पक्षाला संजीवनी देण्याचे काम प्रदेशाध्यक्षांनी, करावे, असे आवाहन केले.
सूत्रसंचालन अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मुन्वर खान यांनी तर प्रास्ताविक शहराध्यक्ष रवींद्र निकम यांनी केले.

