डॉ.चांडक कॅन्सर हॉस्पिटलची मोठी कामगिरी : दुर्मिळ बॉम्बे ब्लड ग्रुपच्या रुग्णावर रेडिएशन व किमोथेरपीनंतर पुन्हा परतलेल्या ‘इसोफेगस कॅन्सर’ वर लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया
जळगाव (21 जून 2026) : छातीतील अन्न-नलिकेच्या (इसोफेगस) कर्करोगामुळे अन्न गिळताना गंभीर त्रास होत असलेल्या अकोला येथील 65 वर्षीय महादेव रांगोळे यांच्यावर जळगावातील चांडक कॅन्सर हॉस्पिटल येथे अत्याधुनिक लॅप्रोस्कोपी पद्धतीने यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. विशेष म्हणजे, रुग्णाचा रक्तगट अत्यंत दुर्मिळ असलेल्या ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ प्रकारातील असल्याने शस्त्रक्रियेसाठी आवश्यक रक्त उपलब्ध करणे हे मोठे आव्हान होते मात्र वैद्यकीय पथकाच्या समन्वयामुळे पुणे आणि मुंबई येथून रक्त मागविण्यात आले . रेडिएशन व किमोथेरपी नंतर पुन्हा परतलेल्या कँसर च्या गाठीची शस्त्रक्रिया क्लिष्ट असते, शिवाय ही गाठ श्वसन नलिकेस चिटकुन होती.जळगावातील प्रसिद्ध कॅन्सरतज्ज्ञ डॉ.निलेश चांडक व त्यांच्या टीम ने मिळून छातीतील अन्ननलिका काढून पोटातील जठर मानेत जोडून ही यशस्वी शस्त्रक्रिया केली.
जळगावातील चांडक हॉस्पीटल रुग्णांसाठी आशेचा किरण
अकोल्यातील रहिवासी असलेल्या महादेव रांगोळे यांना अन्ननलिकेतील कर्करोगामुळे अन्न गिळताना अडचणी निर्माण होत होत्या. आणि सुरुवातीस रेडिएशन किमोथेरपी सारखे उपचार घेतले गेले होते.त्यांच्या अडचणी पाहता त्यांच्या परिचित नातेवाईक डॉ.सुनीती बेंद्रे यांनी त्यांना अधिक उपचारांसाठी जळगावातील चांडक कॅन्सर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रुग्णाची प्रकृती, कर्करोगाचा टप्पा आणि इतर वैद्यकीय बाबींचा सखोल अभ्यास करून शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला.



दुर्मिळ गटातील ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ रक्त उपलब्धतेनंतर यशस्वी शस्त्रक्रिया
जळगावातील प्रख्यात कॅन्सर तज्ज्ञ डॉ.निलेश चांडक यांनी अन्ननलिकेतील कर्करोगग्रस्त भाग शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकत पोटातील जठर अन्ननलिकेशी जोडण्याची अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाचा रक्तगट ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ असल्याचे निदर्शनास आले. हा रक्तगट अत्यंत दुर्मिळ मानला जात असल्याने आवश्यक रक्तसाठा उपलब्ध करून देणे हे मोठे आव्हान होते. यासाठी डॉ.सई नेमाडे यांनी विशेष प्रयत्न करत पुणे व मुंबई येथून या रक्तगटाच्या दोन रक्तबॅग मागवून घेतल्या त्यामुळे शस्त्रक्रियेतील संभाव्य धोके टळले आणि उपचार प्रक्रिया अधिक सुरक्षित झाली.
जटील शस्त्रक्रिया यशस्वी
डॉ.चांडक रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व वैद्यकीय कर्मचार्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ही जटील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली. सध्या महादेव रांगोळे यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. दरम्यान, ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ हा जगातील अत्यंत दुर्मिळ रक्तगटांपैकी एक मानला जातो. या रक्तगटाच्या रुग्णांना केवळ त्याच रक्तगटाचे रक्त देता येते त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रक्त उपलब्ध करणे हे मोठे आव्हान ठरते. अशा परिस्थितीत चांडक कॅन्सर हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाने दाखविलेली तत्परता आणि समन्वयामुळे रुग्णाला नवजीवन मिळाले आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील प्रेरणादायी उदाहरण
दुर्मिळ रक्तगट, गुंतागुंतीचा इसोफॅगस कर्करोग आणि आधी रेडिएशन किमोथेरपी सारखे उपचार घेऊन सुद्धा परतलेल्या कँसरची आव्हानात्मक शस्त्रक्रिया अशा तिहेरी आव्हानांवर मात करत जळगावातील चांडक कॅन्सर हॉस्पिटलने यशस्वी उपचार करून वैद्यकीय क्षेत्रात एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. गायनाची आवड असल्याने शस्त्रक्रियेच्या एका दिवसाआधी त्यांनी ज्या लयीत गाणं म्हटलं होतं, त्याचप्रकारे शस्त्रक्रियेच्या दहा दिवसानंतर त्यांनी त्याच लयीत गायन सुरू केले. रुग्णासह नातेवाईकांनी हॉस्पीटल व डॉ.निलेश चांडक यांच्याबद्दल अत्यंत आदरभाव व्यक्त करीत त्यांचे मनस्वी आभारही मानले आहेत.

