भुसावळात 24 तासानंतरही वीज गुल
भुसावळ : खेडी 132 उपकेंद्रावरून तापी नगर केंद्राला वीज जोडणी करणार्या अंडर ग्राऊंड केबलमध्ये बिघाड झाल्याने भुसावळातील उत्तर भागातील वीजपुरवठा बुधवारी सकाळी 11.30 वाजेपासून ठप्प झाला असून तो गुरुवारी दुपारी 12 वाजेनंतरही सुरळीत करण्यात यंत्रणेला यश आलेले नाही. खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरीकांसह व्यापारीवर्गाचे प्रचंड हाल होत आहेत. दरम्यान, दुरुस्तीसाठी जळगाव येथून विशेष पथक बोलावण्यात आले आहे. वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता पी.आर.घोरूडे, विभागीय अभियंता रवींद्र पद्मे व लाईनमन स्टॉप घटनास्थळी थांबून आहेत.
पाणीपुरवठा ठप्प : व्यावसायीकांचे हाल
अंडर ग्राऊंड केबलमध्ये बिघाड झाल्याने बुधवारी रात्री अर्धे भुसावळ शहर अंधारात बुडाले. रेल्वे रूळाकडील उत्तरेकडचा संपूर्ण भागाचा वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरीकांकडून सातत्याने वीजपुरवठा केव्हा सुरळीत होईल? याबाबत विचारणा केली जात आहे. जळगाव रोड, यावल रोड, मामाजी टॉकीज रोड तसेच तालुका पोलीस ठाण्याच्या परीसरात वीज गुल झाल्याने व्यापारीवर्गासह नागरीकांचे चांगलेच हाल होत असून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.



