हे तर उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम काम : नारायण राणेंचा संताप
मुंबई : शिवसैनिकांनी राणेंच्या भेटीनंतर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाचं गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केल्यानंतर भाजप नेते नारायण राणे यांनी हे शुद्धीकरण करणे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम काम असल्याचं म्हणत संताप व्यक्त केला. नारायण राणे यांनी घेतलेल्या दर्शनानंतर संध्याकाळी काही शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर शुद्धीकरण केलं, यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आला.
स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण
बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचे केअर टेकर आप्पा पाटील यांनी स्मृतीस्थळावर आधी दुग्धाभिषेक आणि त्यानंतर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं आहे. गुरूवारी सकाळी नारायण राणे यांनी स्मृती स्थळाचं दर्शन घेतल्यामुळे हे शुद्धीकरण करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. यावेळी शिवसेनेचे इतर कार्यकर्तेदेखील उपस्थित होते.



शिवसेनच्या शुद्धीकरणाची गरज : आशिष शेलारांची टिका
अशुद्ध आणि शुद्ध असा भेदभाव करणारी मनस्थिती प्रबोधनकार ठाकरेंना मानणार्या पक्षाची आहे. ही विदारक स्थिती आहे. ती जागा काय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची नाही. ती मुंबई महानगरपालिकेची आहे. मुंबई महानगरपालिकेच्या जागी कुणी जायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शुद्धीकरण करायचं असेल तर शिवसेनेचं करावं लागेल, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

