भुसावळात पावसाळ्याला सुरूवात मात्र नालेसफाईला नाही मिळाला ‘मुहूर्त’
नालेसफाईच्या कामाचे व्हावे चित्रीकरण : सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांची मागणी
भुसावळ (21 जून 2026) : पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतरही भुसावळ पालिकेतर्फे नालेसफाईच्या कामाचा मुहूर्त ठरलेला नाही. विधान परिषद निवडणुकीचा अडसर कामासाठी ठरत असलातरी पालिका आपल्याकडील यंत्रणेद्वारे सफाई कामाला सुरूवात करू शकत असतानाही कामे होत नसल्याचे चित्र आहे तर कंत्राट दिल्यानंतरही संबंधित ठेकेदार नालेसफाई केवळ नावापुरती आणि वरवर करीत असल्याने भ्रष्टाचाराला पायबंद लागण्यासाठी यंदा नालेसफाईचे व्हिडिओ चित्रीकरण करावे, अशी मागणी शहरातील सामाजिक कार्यकर्ते शिशिर डी.जावळे यांनी जळगावचे जिल्हाधिकारी आणि भुसावळ नगरपालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शहरात नालेसफाईत अनियमितता
गेल्या अनेक वर्षांपासून भुसावळ शहरात नालेसफाईच्या कामात मोठी अनियमितता असल्याचे समोर आले आहे. ठेकेदारांकडून केवळ नाल्याच्या वरच्या भागाची साफसफाई केली जाते, परिणामी पावसाळ्यात पाणी तुंबून ते थेट नागरिकांच्या घरात शिरते. यामुळे शहरात आरोग्याचे मोठे संकट निर्माण होते आणि साथीचे आजार पसरण्याचा धोका वाढतो. नालेसफाईच्या कामात पूर्ण पारदर्शकता यावी, यासाठी संपूर्ण सफाई प्रक्रियेचे चित्रीकरण (व्हिडिओ रेकॉर्डिंग) करण्यात यावे व पावसाळा सुरू होण्यापूर्वी नालेसफाईचे काम युद्धपातळीवर आणि नियोजित वेळेत पूर्ण करण्यात यावे तसेच
कामात हलगर्जीपणा करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जावळे यांनी केली आहे.



पालिका निधीचा थांबावा अपव्यय
नालेसफाईच्या नावाखाली होणारा पालिकेचा निधीचा अपव्यय आता थांबला पाहिजे. जोपर्यंत काम कॅमेर्यासमोर होत नाही, तोपर्यंत त्यात पारदर्शकता येणार नाही, असे स्पष्ट मत सामाजिक कार्यकर्ते शिशिर डी. जावळे यांनी व्यक्त केले आहे.

