सुप्रमानां मान्यता देऊन योजनांना निधीची उपलब्धता करून देणार
अॅड.रोहिणी खडसेंच्या पाठपुराव्याला यश : मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील उपसा सिंचन योजनांची आढावा बैठक
जळगाव : जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात शुक्रवार, 20 ऑगस्ट रोजी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील उपसा सिंचन योजनांची आढावा बैठक झाली. विविध उपसा सिंचन योजनांच्या आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा जलसंपदा मंत्री यांनी घेत सुप्रमांना मान्यता देऊन योजनांना निधीची उपलब्धता करून देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
अॅड.रोहिणी खडसेंच्या पाठपुराव्याला यश
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांनी गुरुवार, 12 ऑगस्ट रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांच्याकडे मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील बोदवड परीसर उपसा सिंचन योजना, कुर्हा-वढोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजना, मुक्ताई उपसा सिंचन योजना, वरणगाव तळवेल उपसा सिंचन योजना या अपूर्णावस्थेत असलेल्या उपसा सिंचन योजनांची आढावा बैठक घेऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.



जलसंपदा मंत्र्यांनी घेतली बैठक
जलसंपदा मंत्र्यांच्या दालनात झालेल्या बैठकीला जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर, जलसंपदा विभागाचे सचिव ता.ना.मुंडे, विशेष कार्यकारी अधिकारी विजय गौतम, सचिव अ.प्र.कोहिकर, तापी महामंडळाचे कार्यकारी संचालक डी.डी.तवार, तापी महामंडळाचे कार्यकारी अभियंता वाय.एम.कडलग, बोदवड बाजार समितीचे सभापती निवृत्ती पाटील, जि.प.चे माजी सदस्य सुभाष पाटील, माफदा मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष रामभाऊ पाटील, जिल्हा संयोजक विशाल महाराज खोले, हिवरा उपसरपंच रवींद्र पाटील आदींची उपस्त्तिी होती. जळगाव येथून व्हिडीओ कॉन्फ्रन्सद्वारे अधीक्षक अभियंता प्रशांत मोरे, कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन, कार्यकारी अभियंता अदिती कुलकर्णी सहभागी झाले.
मंत्र्यांनी घेतला योजनांचा आढावा
पूर्णा- तापी नदीचे पुराद्वारे वाहून जाणारे पाणी लिफ्ट इरगेशनद्वारे उपसुू मुक्ताईनगर बोदवड कुर्हा परीसरातील शेतीला देऊन शेतीचे कोरडवाहू क्षेत्र बागायती खाली येण्यासाठी एकनाथ खडसे हे जलसंपदामंत्री असताना त्यांनी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रात तापी खोरे विकास महामंडळांतर्गत बोदवड उपसा सिंचन योजना, कुर्हा-वढोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजना, मुक्ताई उपसा सिंचन योजना, वरणगाव-तळवेल उपसा सिंचन योजनांची मुहूर्तमेढ रोवली होती तर या योजनांचे काम सुरू आहे. या उपसा सिंचन योजनांच्या आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी घेतला.
तत्काळ निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही
मुक्ताई उपसा सिंचन योजनेचे 80 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरीत कामासाठी आवश्यक असलेल्या 55 कोटी रुपये निधीचा सुधारीत प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे गेलेला आहे त्यावर जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी प्रस्तावावर तत्काळ निर्णय घेण्यात येईल व निधीची उपलब्धता करून देण्यात येईल, असे सांगितले.
विविध योजना मार्गी लावण्याचे आदेश
मुक्ताईनगर तालुक्यातील जोंधनखेडा गावाजवळ गोरक्षगंगा नदीवर असलेल्या कुंड धरणाचे काम पूर्ण झाले आहे परंतु धरणाच्या भिंतीची उंची वाढविणे व सांडव्याचे काही काम अपूर्ण राहिले आहे यावर धरणाच्या भिंतीची तीन मीटरने उंची वाढविणे व सांडव्याचे अपूर्ण असलेले काम पूर्ण करण्यासाठी सुमारे 19 कोटी रुपये निधीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात येईल, असे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी सांगितले. वरणगाव तळवेल उपसा सिंचन योजनेचे काम जवळपास पुर्ण झाले आहे त्याद्वारे हतनुरचे वाहून जाणारे पाणी ओझरखेडा धरणात टाकण्यात येते परंतु ही योजना काही तांत्रिक अडचणीमुळे बंद अवस्थेत आहे. त्यामुळे योजनेच्या विद्युत पुरवठा व पाणी उपसा करणारे पंपामध्ये बिघाड निर्माण झाला आहे. त्यावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी संबंधित अधिकारी यांना पावसाळ्यापूर्वी दरवर्षी योजनेची तांत्रिक चाचणी घेण्यात यावी असे सक्त निर्देश दिले व आता लवकरात-लवकर विद्युत पुरवठ्याचे व पंपाचे काम करून ओझरखेडा तलावात पाणी सोडण्याचे आदेश दिले तसेच या योजनेचे अपूर्ण असलेले पाणी वितरीकेचे काम करण्यासाठी प्रस्तावाला मंजुरी देण्यात येईल व वितरिकेच्या कामांची निविदा काढण्यात येईल, असे सांगितले. बोदवड परीसरासाठी वरदान ठरणार्या बोदवड उपसा सिंचन योजनेच्या आतापर्यंत झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. बोदवड उपसा सिंचन योजनेसाठी केंद्र शासनाच्या मार्फत 500 कोटी मंजूर झाले आहेत यातील 60 कोटी रुपये निधी मिळाला असून उर्वरीत 433 कोटी रुपये निधी मिळण्यासाठी संबंधित अधिकारी यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी दिले. कुर्हा-वढोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेचे अपूर्ण असलेल्या कामासाठी सुधारीत प्रशासकीय मान्यतेसाठी अहवाल सादर करण्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी संबंधित अधिकारी वर्गाला निर्देश दिले.

