आठ महिन्यांच्या चिमुकलीला एचआयव्ही संक्रमित रक्त ; चौकशीचे आदेश -आरोग्यमंत्री राजेश टोपे
मूर्तिजापूर : एचआयव्ही संक्रमित रक्त चढविल्याने आठ महिन्याच्या चिमुकलीला एचआयव्हीची लागण झाल्याची धक्कादायक बाब तालुक्यातील हिरपूर येथे उघडकीस आली होती. या गंभीर घटनेच्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तालुक्यातल्या हिरपूर येथील एका आठ महिन्याच्या चिमुकलीला एचआयव्ही संक्रमित रक्त दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी नातेवाईकांनी मंत्री टोपे यांच्याकडे बुधवारी तक्रार केली. अन्न व औषधी प्रशासन (एफडीए) व स्थानिक आरोग्य विभागाचे अधिकारी चौकशी करतील. येत्या दोन-तीन दिवसांत त्याचा अहवाल प्राप्त होईल. त्यानुसार कारवाई केली जाईल, असेही आरोग्य मंत्री टोपे म्हणाले. रक्तपेढीने दात्याकडून रक्त घेताना एचआयव्ही टेस्ट करून रक्त स्वीकारणे आवश्यक होते. त्याचबरोबर ज्या खाजगी रुग्णालयात त्या चिमुकलीवर उपचार सुरू होता. त्या रुग्णालयाने रक्ताचे नमुने घेऊन चाचणी करणे आवश्यक होते. यात हलगर्जीपणा झाल्याचे दिसून येते. याची पूर्ण चौकशी केल्यानंतर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.




