दराणेत डॉक्टरांचा खून करीत दुचाकी लांबवली : तिघे आरोपी जाळ्यात


शिंदखेडा : पोळा सणाला नवी दुचाकी घेवून दराणे गावाकडे निघालेल्या तरुण डॉक्टरांना रस्त्यात अडवून तिघा दरोडेखोरांनी मारहाण करीत त्यांच्याकडील दुचाकी लांबवली. दरोडेखोरांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुण डॉक्टरांचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त गावकर्‍यांनी रास्ता रोको आंदोलन केले. जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला. खून प्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली. तरुण डॉक्टरांचा ऐन सणाला खून झाल्यानंतर दराणे गावात कुणीही सण साजरा केला नाही.

चाकू हल्ला करीत लांबवली दुचाकी
व्हेटर्नरी डॉक्टर असलेल्या प्रेमसिंग गिरासे यांनी शिंदखेडा येथून सोमवारी नवी दुचाकी घेतल्यानंतर गावाकडचा प्रवास सुरू केल्यानंतर दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास चिमठाणे गावाजवळील रेस्ट हाऊसजवळ अज्ञात तिघा लुटारूंना त्यांना अडवत त्यांच्याकडील मोबाइल आणि दुचाकी हिसकावण्याच्या प्रयत्न केला मात्र त्यास विरोध केल्यानंतर एका आरोपीने चाकूने सपासप वार केल्याने डॉ.प्रेमसिंग जागेवरच कोसळले. यानंतर आरोपी नवी दुचाकी घेवून पसार झाले. ग्रामस्थांना घटना कळताच त्यांनी प्रेमसिंग गिरासे यांना धुळे येथे हलवले मात्र रस्त्यातच त्यांचा मृत्यू ओढवला.

ग्रामस्थ संतप्त : रास्ता रोकोने वाहतूक ठप्प
डॉक्टरांच्या मृत्यूनंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करून आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी आंदोलकांची समजूत काढली. या घटनेचे मलाही दु:ख आहे. रस्त्यावर कुणीही गुन्हा करत असेल तर त्याला जरब दाखवण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. या घटनेतील मारेकरी नरकात जरी असेल तरी त्याला शोधून काढेल. तो सापडला नाही तर नोकरी सोडून देईन, असे आश्वासन पोलिस अधीक्षक पंडित यांनी जमावाला दिल्यानंतर जमाव शांत झाला. सोमवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास तीन संशयीतांना अटक करण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !