प्रवीण दरेकरांच्या वादग्रस्त वक्तव्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीव्र संताप
अकोला : लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 16 सप्टेंबर रोजी प्रवेश करीत असताना विधान परीषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केल्याने राष्ट्रवादीतर्फे दरेकरांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गरीबांकडे पहाण्यासाठी वेळ नाही. रंगलेल्या गालाचे मुके घेणारा हा पक्ष आहे’, असं वादग्रस्त वक्तव्य दरेकरांनी सोमवारी पुणे जिल्ह्यातील शिरूर इथं क्रांतीकारक उमाजी नाईक जयंती कार्यक्रमात केल्यानंतर दरेकरांवर टिका होत आहे. कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा हा पक्ष असल्याचा घणाघात दरेकर यांनी यावेळी केला होता.
राष्ट्रवादीत संतापाची लाट
दरेकरांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संतापाची लाट पसरली आहे. पक्षाच्या नेत्यांनी दरेकरांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. तर पक्षाच्या चित्रपट आाणि सांस्कृतिक विभागाने दरेकरांच्या या वक्तव्यावर अतिशय संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दरेकरांवर कायदेशीर आणि फौजदारी कारवाईसाठी राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाने चाचपणी सुरू केली आहे. यासंदर्भात प्रवीण दरेकरांविरोधात पोलीस तक्रार करणार असल्याचे राष्ट्रवादी चित्रपट विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.




