अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
चाळीसगाव : अज्ञात वाहन चालकाच्या धडकेत वयोवृद्ध दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी अंती अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शहरातील बालाजी नगरजवळ 15 सप्टेंबर रोजी रात्री घडली होती. कमलाकर काशीराम जंगले (62, चाळीसगाव) असे मयताचे नाव आहे.
अज्ञात वाहन चालकाचा पोलिसांकडून शोध
चाळीसगाव शहरातील महाराणा प्रताप हौसिंग सोसायटी येथील कमलाकर काशीराम जंगले (62) हे आपल्या दुचाकीवरून (क्रमांक एम.एच.15 ए.एफ. 8758) मालेगाव कडून चाळीसगावाकडे येत असताना अज्ञात भरधाव वाहनाने जोरदार धडक दिल्याने जंगले यांचा जागीच मृत्यू झाला होता. हा अपघात 15 सप्टेंबर रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास मालेगाव-चाळीसगाव रोडवरील बालाजी नगराजवळ घडला होता. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक पसार झाला होता. सुरुवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली व नंतर पोलिसांनी तपास केल्यानंतर मयताचा मुलगा राकेश कमलाकर जंगले यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात भादंवि कलम 304 (अ), 279, 337, 338, 427 व मोटार वाहन कायदा 184,134(ब) प्रमाणे अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या निर्देशानुसार मुकेश पाटील करीत आहेत.

