कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या : पत्नी बेपत्ता झाल्याचा बनाव उघड
हिंगोली : वसमत तालुक्यातील डोणवाडा येथे पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार देणारा पतीच खुनी निघाल्याचे कुरुंदा पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे. यावरून कुरुंदा पोलिस ठाण्यात गुरुवारी खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी मृताच्या पतीस अटक केली आहे. बालाजी भगवान कुरुडे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
वादानंतर पत्नीचा केला खून
कुरुंदा येथील बालाजी कुरुडे व त्याची पत्नी कमल (28) यांच्यात मागील काही दिवसांपासून किरकोळ कारणावरून वाद होत होते. या वादातून बालाजी याने मंगळवारी पहाटे त्याची पत्नी कमल यांचा गळा दाबून खून केला अन् मृतदेह शेतातील विहिरीत फेकून दिला. दरम्यान, त्याच दिवशी दुपारच्या सुमारास बालाजीने कुरुंदा पोलिस ठाणे गाठून पत्नी कमल बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद घेऊन शोध सुरू केला. पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, सहायक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कुरुंदा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, उपनिरीक्षक नितीन केणेकर यांनी तपास सुरू केला. यामध्ये त्यांचा बालाजीवरच संशय बळावला होता. त्यामुळे पोलिसांनी बालाजीची चौकशी सुरू केली. त्यानंतर बुधवारी कमल यांचा मृतदेह त्यांच्या शेतातील विहिरीत आढळून आला. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. यामध्ये महिलेचा गळा दाबून खून झाल्याचा अहवाल देण्यात आला. त्यावरून पोलिसांनी बालाजीची कसून चौकशी केल्यानंतर त्याने खुनाची कबुली दिली.



