जळगाव जिल्ह्यात अवैध वाळूविरोधात पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक : 24 तासात 19 लाख 49 हजारांचा मुद्देमाल जप्त


जळगाव (रविवार, 23 ऑगस्ट 2026) : जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीविरोधात जिल्हा पोलिस दलाने मोहिम हाती घेतली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कठोर कारवाईचे निर्देश दिल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वाळू तस्करांविरोधात धडक कारवाई सुरू झाली आहे. गत 24 तासांत तब्बल 19 लाख 49 हजार 345 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने अवैध वाळू वाहतूकदार धास्तावले आहेत.

वाळू चोरट्यांविरोधात सहा गुन्हे
पोलिसांच्या कारवाईत 45 ब्रास वाळू, तीन ट्रॅक्टर आणि दोन पिकअप वाहने जप्त करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद, जळगाव तालुका, यावल, रावेर आणि भुसावळ तालुका पोलीस ठाण्यांत एकूण सहा गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईमुळे अवैध वाळू तस्करी करणार्‍यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.




गायरानात वाळूचा ठिय्या ; ट्रॅक्टरसह 26.5 ब्रास वाळू जप्त
नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेळगाव येथील तापी नदीपात्राजवळील गायरान भागात मोठ्या प्रमाणात वाळूचा अवैध साठा ताब्यात घेण्यात आला. स्वराज ट्रॅक्टर, ट्रॉली आणि तब्बल 26.5 ब्रास वाळू असा एकूण चार लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सागर पोपट गोसावी व इतर तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगाव तालुका पोलिसांची दोन ठिकाणी कारवाई
जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या पथकानेही अवैध वाळू वाहतुकीविरोधात दोन स्वतंत्र कारवाया केल्या. कानळदा ते विदगाव रस्त्यावरील वीज कंपनीच्या सब-स्टेशनजवळ सापळा रचून पोलिसांनी पिकअप वाहनांवर कारवाई केली. पहिल्या कारवाईत प्रफुल्ल गुणवंत नेहते याच्याकडून महिंद्रा पिकअप आणि एक ब्रास वाळू असा पाच लाख 24 हजार 230 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुसर्‍या कारवाईत अज्ञात चालक व मालकाच्या ताब्यातील महिंद्रा लहान पिकअप आणि 0.5 ब्रास वाळू, असा चार लाख 12 हजार 115 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधित वाहनचालक व मालक पसार असल्याचे पोलिसांनी नमूद केले.

यावलमध्ये ट्रॅक्टरसह वाळू जप्त
यावल पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यात आली. नामदेव मुकंदा सोळंके (कोळन्हावी) याच्याकडून स्वराज ट्रॅक्टर आणि एक ब्रास वाळू मिळून चार लाख 56 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

रावेरमध्येही वाळू तस्करीला आळा
रावेर पोलीस ठाण्याच्या पथकाने तामसवाडी येथील अनिल साहेबराव रायमळे याच्यावर कारवाई करत स्वराज ट्रॅक्टर आणि एक ब्रास वाळू जप्त केली. या कारवाईत एक लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

महसुलाने जप्त केलेली वाळूच चोरून नेली
भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साकेगाव येथे वाळू चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी जप्त करून पोलीस पाटलांच्या ताब्यात दिलेली 15 ब्रास वाळू, अंदाजे 45 हजार रुपये किमंतीची, संशयित गजानन पंडित जवरे याने रात्रीच्या अंधारात चोरून नेल्याचा आरोप आहे. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

एकाच कारवाईत मोठा मुद्देमाल जप्त
या सर्व कारवायांचा एकत्रित विचार करता पोलिसांनी एकूण सहा गुन्हे दाखल करून 45 ब्रास वाळू आणि पाच वाहने जप्त केली आहेत. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 19 लाख 49 हजार 345 रुपये आहे.

पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर यंत्रणा सक्रिय
जिल्ह्यातील नदीपात्र, गायरान आणि विविध मार्गांवरून सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वतः नदीपात्रांची पाहणी केल्यानंतर दिलेल्या सूचनांमुळे स्थानिक पोलीस यंत्रणा अधिक सक्रिय झाल्याचे या कारवायांतून दिसून येत आहे. अवैध वाळू तस्करीविरोधातील या धडक कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याने रेती माफियांचे धाबे दणाणले आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !