पिंप्राळ्यात तरुणाची गळफास घेत आत्महत्या


जळगाव : पिंप्राळ्यातील चिंचपुरा भागातील ज्ञानेश्वर अशोक पवार (नाथजोगी, वय 35) या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. बुधवारी दुपारी 1.30 वाजता ही घटना उघडकीस आली. या घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पवार हे सेन्ट्रींगचे काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. दरम्यान, बुधवारी दुपारी घरात कोणी नसताना त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. थोड्या वेळाने त्यांच्या पत्नी मंजुळाबाई घरात आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. यानंतर परीसरातील तरुणांनी पवार यांचा मृतदेह उतरवुन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला होता. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करून पवार यांना मृत घोषित केले. पवार यांनी आत्महत्या का केली याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. पवार यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी मंजुळाबाई, मुली तेजस्वीनी (12), पुर्वा (5), मुलगा पार्थ (2), सविता व कविता अशा दोन विवाहित बहिणी, भाऊ किशोर असा परीवार आहे. या घटनेनंतर रामानंदनगर पोलिस ठाण्याचे अनिल फेगडे, सुभाष सोनवणे यांनी पंचनामा केला. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दसरा सण केला उत्साहात साजरा
सेन्ट्रींगचे काम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार्‍या पवार यांनी मंगळवारी उत्साहात दसरा सण साजरा केला. तीन्ही मुलांना नवीन कपडे खरेदी केले होते. पवार दाम्पत्याने जोडीने परिसरातील नातेवाईक, मित्रांना घरी जाऊन सोने दिले होते. आनंदात असलेल्या पवार यांनी अचानक अशा प्रकारे आत्महत्या केल्यामुळे पवार कुटुंबियांसह सर्वांनाच धक्का बसला. घटनेनंतर कुटुंबियांनी रुग्णालयात प्रचंंड आक्रोश केला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !