‘हतनूरचे वारकरी’ लघुपटाची आंतरराष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवासाठी निवड


जळगाव (शनिवार, 12 सप्टेंबर 2026) : हतनूर धरण जलाशयाची समृद्ध पक्षीविविधता आणि सांस्कृतिक वारसा अधोरेखित करणार्‍या ‘हतनूरचे वारकरी’ या लघुपटाची पाचव्या इंटरनॅशनल टुरीझम शॉर्ट फिल्म फेस्टीवल 2026 साठी नामांकन झाले आहे. पुणे येथे 26 व 27 सप्टेंबर 2026 रोजी हा आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव होणार आहे.

पक्षी अभ्यासक अनिल महाजन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या लघुपटाच्या निर्मितीसाठी तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि चातक निसर्ग संवर्धन संस्था यांचे सहकार्य लाभले आहे. हातनूर धरण परिसरातील जैवविविधता, विशेषतः विविध पक्षीप्रजातींचे अधिवास, त्यांचे निरीक्षण तसेच या परिसराशी जोडलेली सांस्कृतिक परंपरा यांचे प्रभावी चित्रण या लघुपटातून करण्यात आले आहे.

लघुपटाचे दिग्दर्शन पुणे येथील अरविंद जोशी यांनी केले असून, विशेष गांधी यांनी चित्रीकरणाची जबाबदारी सांभाळली आहे. निर्मिती प्रक्रियेत सत्यपालसिंग राजपूत, सौरभ महाजन, समीर नेवे, पियुष महाजन, राजपालसिंग राजपूत, उदय चौधरी यांच्यासह अनेकांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

हतनूर जलाशय हा पक्ष्यांसाठी महत्त्वाचा अधिवास असून, या परिसरातील पक्षीविविधता आणि त्यामागील निसर्गसंपदा व्यापक स्तरावर पोहोचविण्याचा प्रयत्न या लघुपटातून करण्यात आला आहे. त्यामुळे या लघुपटाला मिळालेले आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे नामांकन हे हातनूरच्या नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारशाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

हतनूर परिसरातील निसर्ग, पक्षी आणि जैवविविधतेच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या चातक निसर्ग संवर्धन संस्थेच्या प्रयत्नांना या नामांकनामुळे नवी ऊर्जा मिळाली असून, या यशाबद्दल संबंधित सर्व स्तरांतून समाधान व्यक्त होत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !