टिंडरवर मैत्री, भेटीचा बहाणा अन् हॉटेलमध्ये अत्याचार
दोन बहिणींना सीवूड्समधील हॉटेलमध्ये नेल्याचा आरोप; एक पीडिता अल्पवयीन
नवी मुंबई (रविवार, 13 सप्टेंबर 2026) : डेटिंग अॅप टींडरच्या माध्यमातून अनोळखी व्यक्तींशी ओळख वाढवताना तरुणींनी अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित करणारी धक्कादायक घटना नवी मुंबईत समोर आली आहे. टिंडर अॅपवरून ओळख झालेल्या दोन तरुणांनी सांताक्रूझ येथील दोन सख्ख्या बहिणींना भेटण्यासाठी सीवूड्स येथे बोलावत दोघींना हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार केल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पीडित बहिणींमध्ये एक अल्पवयीन असल्याने प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. या प्रकरणातील गुन्हा मुंबईत दाखल झाल्यानंतर पुढील तपासासाठी तो नवी मुंबईतील एनआरआय सागरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
ऑनलाईन ओळखीतून वाढली जवळीक
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सांताक्रूझ परिसरात राहणार्या दोन बहिणींची काही दिवसांपूर्वी टिंडर डेटिंग पवरून दोन तरुणांशी ओळख झाली. सुरुवातीला ऑनलाइन चॅटिंगच्या माध्यमातून संवाद सुरू झाला. या काळात संशयितांनी दोन्ही बहिणींचा विश्वास संपादन केला आणि त्यांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी सीवूड्स येथे बोलावले. मुलींना सीवूड्सपर्यंत पोहोचणे सोपे जावे यासाठी आरोपींनी ऑनलाईन टॅक्सी बुक करून दिल्याचे तपासात समोर आले आहे. टॅक्सीने सीवूड्स येथे पोहोचल्यानंतर संशयितांनी दोन्ही बहिणींना मॉलसह परिसरातील काही ठिकाणी फिरवले.
फिरायला नेले, बीयर पाजल्याचा आरोप
फिरत असताना दोन्ही तरुणांनी बहिणींना एका ठिकाणी नेले. तेथे त्यांना जबरदस्तीने बीअर पाजल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर दोन्ही मुली मद्यधुंद अवस्थेत गेल्याचे सांगण्यात येते. याच परिस्थितीचा फायदा घेत ‘काही वेळ विश्रांती घेऊ’ असे सांगून संशयितांनी दोघींना सीवूड्समधील एका हॉटेलमध्ये नेले.
मध्यरात्री हॉटेलमध्ये अत्याचार
हॉटेलमध्ये नेल्यानंतर दोन्ही बहिणी असहाय अवस्थेत असताना मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर दोन्ही पीडित बहिणी घरी परतल्या. घरी आल्यानंतर त्यांनी पालकांना घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. घटनेची माहिती मिळताच पालकांनी पोलिसांशी संपर्क साधत तक्रार दाखल केली.
पोलिसांकडून सीसीटीव्ही आणि टॅक्सी बुकिंगची तपासणी
तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही पीडितांची वैद्यकीय तपासणी केली आहे. प्रकरणाचा तपास सध्या एनआरआय सागरी पोलिसांकडून सुरू आहे.संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सीवूड्समधील मॉल, हॉटेल तसेच अन्य ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय आरोपींनी बुक केलेल्या ऑनलाइन टॅक्सीचा तपशीलही तपासला जात आहे. या माध्यमातून संशयितांपर्यंत पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.
अल्पवयीन मुलीला हॉटेलमध्ये प्रवेश कसा मिळाला?
या प्रकरणातील एक पीडिता अल्पवयीन असल्याने हॉटेल प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अल्पवयीन मुलीला हॉटेलमध्ये प्रवेश देताना ओळखपत्रांची योग्य पडताळणी करण्यात आली होती का, याचा तपास पोलीस करत आहेत.
हॉटेलमधील प्रवेश नोंदी, सीसीटीव्ही फुटेज आणि व्यवस्थापनाकडील कागदपत्रांचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. हॉटेल प्रशासनाकडून नियमांचे उल्लंघन किंवा निष्काळजीपणा झाल्याचे आढळल्यास संबंधितांवरही कारवाई होऊ शकते. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास एनआरआय सागरी पोलीस करत असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध दिशांनी तपास सुरू आहे.

