फळ पीक विमा कंपन्यांनी लूट न थांबवल्यास आंदोलन
मुक्ताईनगरात निवेदनाद्वारे डॉ.विवेक सोनवणे यांचा तहसीलदार प्रशासनाला इशारा
मुक्ताईनगर : पीक विमा कंपन्यांनी 2020-21 चा फळ पीक विमा हा अत्यंत तुटपुंजा अश्या पद्धतीने जाहीर करून शेतकर्यांच्या खात्यात रक्कम जमा करायला सुरुवात केलेली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आलेल्या चक्रीवादळात केळी उत्पादक शेतकर्यांचे शंभर टक्के नुकसान झाले असून शासनाच्या आदेशानुसार हेक्टरी 64 हजार मदत मिळणे बंधनकारक असताना पीक विमा कंपन्यांनी बहुतांश ठिकाणी नुकसानीची टक्केवारी ही कमी दाखवून शेतकर्यांना अत्यंत तुटपुंज्या स्वरूपाची मदत केली आहे. फळ पीक विमा कंपन्यांकडून शेतकर्यांची होणारी लूट थांबवावी, अशी मागणी प्रशासनाकडे डॉ.विवेक सोनवणे यांनी केली आहे.
तक्रारीनंतरही पंचनामे नाहीत
बहुतांश ठिकाणी शेतकर्यांनी पीक विमा कंपन्यांच्या नियमानुसार नुकसानीनंतर तत्काळ तक्रार नंबरवर तक्रार नोंदवून सुद्धा बहुतांशी शेतकर्यांचे पंचनामे झालेले नाहीत. आज पीक विमा कंपन्यांचे प्रतिनिधी सांगत आहेत की, आता सामूहिक पंचनामे करून मदत मात्र शासन आदेशानुसार शेतकर्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम 5 सप्टेंबरच्या आधी शेतकर्यांना मिळणे बंधनकारक असून सुद्धा पीक विमा कंपन्या शासन आदेशाचे उल्लंघण करीत आहे. याचा अनुभव जिल्ह्यातील शेतकर्यांना वारंवार येत आहे.



तर पीक विमा कंपन्यांविरोधात आंदोलन
2019-2020 च्या पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम आजतागायत बहुतांश शेतकर्यांना मिळालेली नाही. केळी उत्पादक शेतकर्यांचे चक्रीवादळामुळे झालेल्या शंभर टक्के नुकसानीचेी सरसकट हेक्टरी 64 हजारांप्रमाणे मदत जाहीर करून पीडित शेतकर्यांच्या खात्यात तत्काळ रक्कम बँक खात्यात जमा करावी व मागणी मान्य न झाल्यास जिल्हाभरातील शेतकर्यांना सोबत घेऊन संपूर्ण जिल्ह्यात विमा कंपन्यांच्या विरोधात तीव्र जनअक्रोश आंदोलन करण्यात येईल, असा इशारा डॉ. विवेक सोनवणे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदन देताना बहुजन मुक्ती पार्टी लोकसभा प्रभारी प्रमोद सौंदळे, शेतकरी सुरेश पाटील, अमोल वैद्य, हेमंत पाटील, अनिकेत सोनार उपस्थित होते.
