श्री क्षेत्र कोथळीत 21 पासून श्रीमद् भागवत कथा व कीर्तन
फैजपूर : सांप्रदायिक समन्वय निर्माण व्हावा व सनातन संस्कृती बळकट व्हावी या उदात्त हेतूने फैजपूर येथील महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांच्या प्रेरणेतून श्री संत आदिशक्ती मुक्ताई यांच्या सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सतपंथ संप्रदायामार्फत श्रीमद् भागवत कथा व कीर्तनाचे आयोजन 21 ते 27 दरम्यान करण्यात आले आहे. श्री क्षेत्र मुक्ताईनगर-कोथळी येथील जुन्या मंदिरात हे धार्मिक कार्यक्रम होतील.
सप्ताहभर विविध कार्यक्रम
हभप रवींद्र महाराज हरणे, श्री हभप उद्धव महाराज जुनारे व संस्थाध्यक्ष अॅड.रवींद्र भैय्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताहभर दैनंदिन विविध कार्यक्रम होतील. 21 ते 7 दरम्यान होणार्या विशेष कार्यक्रमात दररोज सकाळी पाच ते सहा वाजता काकड आरती, आठ ते दहा वाजता नामजप, दुपारी बारा ते चार वाजता आचार्य अमृताश्रम स्वामी महाराज (श्रीक्षेत्र नवगण राजुरी, जि. बीड) यांच्या श्रवणीय वाणीतुन श्रीमद् भागवत कथेचे वाचन होईल.
यांचे होणार कीर्तन
दररोज रात्री साडेसात ते साडेनऊ यादरम्यान वारकरी संप्रदायाचे प्रसिद्ध कीर्तनकार यांचे कीर्तन होईल. 21 नोव्हेंबर रोजी हभप परमेश्वर महाराज (गोंडखेल जामनेर), 22 रोजी हभप बाळकृष्ण महाराज (वसंतगडकर, ता.कराड, जि. सातारा), 23 रोजी हभप ज्ञानेश्वर माऊली (बेलदारवाडी, ता.चाळीसगा), 24 रोजी हभप भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ (श्री ज्ञानेश आश्रम, वारी भैरवगड), 25 रोजी हभप रामायणाचार्य संजय महाराज (पाचपोर खामगाव), 26 रोजी हभप कान्होबाराय महाराज देहूकर (श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराजांचे वंशज), तसेच 27 नोव्हेंबर रोजी सकाळी साडे आठ ते दहा वाजता श्री हभप वारकरी भूषण रवींद्र महाराज हरणे (श्री मुक्ताई संस्थान, मुक्ताईनगर) यांचे सुश्राव्य काल्याचे कीर्तन होईल. या कीर्तनानंतर लगेच दहा ते बारा या वेळेत संत संमेलनाचे आयोजनही करण्यात आले आहे. हा सर्व कार्यक्रम सनातन सतपंथ संप्रदायद्वारा आयोजित करण्यात आला आहे.
यांची कार्यक्रमास राहणार उपस्थिती
सर्व कार्यक्रमास महामंडलेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज, फैजपूर यांच्या विशेष उपस्थितीसह पूजनीय संत महात्मा, कीर्तनकार, टाळकरी, वारकरी, लोकप्रतिनिधी, धर्मप्रेमी भाविक उपस्थिती देतील. या कार्यक्रमाचा लाभ पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन आयोजक सतपंथ मंदिर संस्थानचे गादीपती तथा अखिल भारतीय संत समितीचे खजिनदार महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी केले आहे.


