जळगाव सलून व्यावसायीकाच्या खुनाने हादरले !


जळगाव : सलून व्यावसायीकाचा चॉपर वार करून खून करण्यात आल्याची घटना शहरातील चौघुले प्लॉट परीसरात रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत सुनील सुरेश टेमकर (36, रा.प्रजापत नगर) या तरुणाचा मृत्यू झाला. तत्पूर्वी तरुणाला गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान अल्पवयीन मुलांच्या टोळीतील एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून मुख्य संशयिताचा शोध आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

35 वर्षीय तरुणाचा खून
ममुराबाद रस्त्यावर असलेल्या प्रजापत नगरात सुनील सुरेश टेमकर (35) या तरुणाचे चौगुले प्लॉट परीसरात सलून दुकान आहे. गेल्या पाच दिवसांपासून तो आजारी असल्याने त्याचे दुकान बंद होते. रविवारीच त्याने दुकान उघडले होते. रात्री 10 वाजेच्या सुमारास एक अल्पवयीन मुलगा दुकानावर आला. त्याने टेमकरला ब्लेड मागितले. टेमकर याने ब्लेड देण्यास नकार दिला असता दोघांमध्ये वाद झाला. या वादात अल्पवयीन मुलाने टेमकरवर छातीत चॉपरने वार केले. यात त्याला गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा मृत्यु झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यावर अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह शनिपेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बळीराम हिरे व कर्मचार्‍यांनी जिल्हा रुग्णालय गाठले. अपर पोलिस अधीक्षकांनी घटनास्थळाला भेट देत माहिती जाणून घेतली. दरम्यान, खुनाच्या घटनेने गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढल्याचे दिसून आले. मयत पश्चात सुनील टेमकर याच्या पश्चात आई, पत्नी योगिता, मुलगा रोनक, मुलगी दीप्ती, भाऊ असा परीवार आहे.

शनीपेठ पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल
याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. टेमकर याच्यावर वार करणारा अल्पवयीन मुलगा हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील असून तो सराईत गुन्हेगार असल्याची सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान घटना घडल्यानंतर शनिपेठ पोलिसांच्या गुन्हे शोध पथकातील कर्मचार्‍यांनी संशयितांबाबत माहिती काढली. यात लेंडी नाल्याजवळील पडक्या शाळेजवळ एका अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मुख्य संशयीत अल्पवयीन मुलगा पसार असून त्याचाही शनिपेठ शोध घेत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !