200 रुपयांचे लाच प्रकरण : भुसावळातील पंटराचा अटकपूर्व जामीन फेटाळला
जळगाव : 200 रुपयांची लाच मागणार्या पंटरविरूध्द रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीताचा अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला मात्र न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला.
लाच मागणीप्रकरणी भुसावळातील पंटराविरोधात दाखल आहे गुन्हा
वाहन हस्तांतरणासाठी अधिकृत फी भरल्यानंतरही 200 रुपयांची लाच मागणार्या प्रशांत जगन्नाथ भोळे उर्फ पप्पु भोळे (रा.भुसावळ) या पंटरविरुद्ध 28 ऑक्टोबर रोजी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने वाहन प्रतिनिधी गणेश कौतीकराव ढेंगे (59, रा. अनुराग स्टेट बँक कॉलनी) यांच्याकडे पैश्यांची मागणी केली होती. जितेंद्र सोनार यांची दुचाकी हस्तांतरण प्रकरणात पंटर भोळे याने लाच मागीतली होती. यावेळी ढेंगे यांनी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागात तक्रार केली. दोन वेळा सापळा रचुन देखील भोळे रंगेहात अटक झाला नव्हता. परंतु, लाच मागीतल्याचे रेकॉर्डींग उपलब्ध झाल्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, भोळे याने अटकपुर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. आता पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे.


