जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत या उमेदवारांनी मिळवला विजय
जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर सोमवारी सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरूवात झाली. काही अनपेक्षित तर काही अपेक्षीत निकालही लागल्याचे या निवडणुकीत दिसून आले. या निवडणुकीत विजयी उमेदवारांना मिळालेली मते अशी-
11 उमेदवारांची बिनविरोध निवड
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 11 उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले. त्यात मुक्ताईनगरमधून माजी मंत्री एकनाथराव खडसे, जळगाव सोसायटी मतदारसंघातून महापौर जयश्री सुनील महाजन, चाळीसगाव सोसायटी मतदारसंघातून प्रदीप रामराव देशमुख, पाचोरा सोसायटी मतदारसंघातून किशोरआप्पा पाटील, जामनेरमधून नाना राजमल पाटील, धरणगावमधून संजय पवार, बोदवडमधून रवींद्रभैय्या पाटील, भडगावमधून प्रतापराव हरी पाटील, अमळनेरमधून आमदार अनिल भाईदास पाटील, पारोळ्यातून आमदार चिमणराव पाटील तर एरंडोलमधून अमोल चिमणराव पाटील या उमेदवारांचा समावेश होता.

दहा जागांवरील विजयी उमेदवार असे
1) भुसावळ सोसायटी मतदारसंघात एकूण 26 जणांनी मतदान केले होते. यात आमदार संजय वामन सावकारे यांना 22 तर शांताराम पोपट धनगर यांना चार मते मिळाली. येथून संजय सावकारे यांचा 18 मतांनी विजय झाला.
2) यावल सोसायटी मतदारसंघात तिरंगी लढत होती. यात एकूण 47 मतदान झाले. यात विनोदकुमार पंडित पाटील यांना 25 तर गणेश गिरीधर नेहेते यांना 22 मते पडली. तिसरे उमेदवार प्रशांत लिलाधर चौधरी यांना शून्य मते मिळाली. यामुळे येथून विनोदकुमार पाटील यांचा तीन मतांनी विजय झाला.
3) चोपडा सोसायटी मतदारसंघातही तिरंजी लढत होती. यात 63 जणांनी मतदान केले. यात सहकार पॅनलचे घनश्याम अग्रवाल यांना सर्वच्या सर्व म्हणजे 63 मते मिळाली. तर त्यांचे विरोधक डॉ. सुरेश शामराव पाटील आणि संगीताबाई प्रदीप पाटील यांना शून्य मते मिळाली. यामुळे येथे घनश्याम अग्रवाल यांचा 63 मतांनी विजय झाला.
4) रावेर सोसायटी मतदारसंघात तिरंगी लढत असली तरी दोन्ही मतदारांनी अरूण पांडुरंग पाटील यांना पाठींबा दिला होता. मात्र शेवटच्या टप्प्यात सहकार पॅनलच्या जनाबाई गोंडू महाजन यांनी आगेकूच केल्याने लढत रंगतदार झाली. येथे एकूण 51 जणांनी मतदान केले. यात अरूण पाटील यांना 25 तर जनाबाई महाजन यांना 26 मते मिळाली. यामुळे अवघ्या एक मताने जनाबाई महाजन यांनी बाजी मारली.
5) अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघात तिरंगी लढत होती. यात 1615 मतदारांनी आपला हक्क बजावला. यामध्ये सहकार पॅनलचे शामकांत बळीराम सोनवणे यांना 2464; नामदेव भगवान बाविस्कर यांना 83 तर प्रकाश यशवंत सरदार यांना 68 मते मिळाली. अर्थात येथून शामकांत सोनवणे हे तब्बल 2381 मतांनी विजयी झाले.
6) इतर मागासवर्ग मतदारसंघात चौरंगी निवडणूक झाली. यात एकूण 2621 मतदारांनी आपला हक्क बजावला. यामध्ये माजी मंत्री तथा सहकार पॅनलचे नेते डॉ. सतीश पाटील यांना 2316; विकास मुरलीधर पवार यांना 242, प्रकाश जगन्नाथ पाटील यांना 40 तर राजीव रघुनाथ पाटील यांना 23 मते मिळाली. म्हणजेच येथून डॉ. सतीश पाटील हे 2074 मतांनी विजयी झाली.
7) विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गात एकास एक लढत झाली. येथे 2606 मतदारांनी आपला हक्क बजावला. यात मेहताबसिंग रामसिंग नाईक यांना 2326 तर विकास ज्ञानेश्वर वाघ यांना 280 मते मिळाली. यामुळे मेहताबसिंग नाईक यांचा 2046 मतांनी विजय झाला.
8 आणि 9 ) महिला राखीव मतदारसंघातून सहकार पॅनलच्या उमेदवार तथा मावळत्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर या 2335 तर शैलजादेवी दिलीप निकम या 1925 मते मिळवून विजयी झाल्या. त्यांच्या विरोधातील उमेदवार अरूणा दिलीपराव पाटील यांना 524 तर कल्पना शांताराम पाटील यांना 111, सुलोचना भगवान पाटील यांना 11 तर शोभा प्रफुल्ल पाटील यांना सहा मते मिळाली.
10) इतर संस्था आणि व्यक्तीगत सभासद या वर्गवारीमध्ये पंचरंगी लढत झाली. या प्रवर्गात एकूण 1805 मतदान झाले. यातील सहकार पॅनलचे नेते तथा माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना 1601; जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र सूर्यभान पाटील यांना 181; प्रकाश यशवंत सरदार यांना 13; प्रकाश जगन्नाथ पाटील यांना 7 तर उमाकांत रामराव पाटील यांना 3 मते मिळाली. यामुळे येथून गुलाबराव देवकर यांनी तब्बल 1420 मतांच्या फरकाने विजय मिळविला. दरम्यान, या निकालातून भुसावळ सोसायटी मतदारसंघाचा अपवाद वगळता उर्वरित 20 जागांवर महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलने विजय संपादन करून आपले एकहाती वर्चस्व सिध्द केले आहे.
