भुसावळातील प्रभाग 17 मधील ढाप्यांची व्हावी दुरुस्ती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे शहराध्यक्ष निलेश कोलते यांची मागणी ः पालिका प्रशासनाने घ्यावी दखल
भुसावळ : गत अनेक वर्षापासून प्रभाग क्रमांक 17 मधील सर्वेश्वर नगर, युवा संकल्प चौकाकडून पाटील मळा व रामदेव बाबानगरकडे जाणार्या रस्त्याचे नूतनीकरण झाले नसतानाच आता या नादुरुस्त असलेल्या ढाप्यावरून गटारीचे पाणी वाहत असल्याने आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. पावसाचे पाणी काही ठिकाणी साचत आल्याने हे ढापे जीवघेणे ठरत आहेत शिवाय वाहने अडकत असल्याने ढाप्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे शहराध्यक्ष निलेश कोलते यांनी केली आहे.
सर्व ढाप्यांची झाली चाळण
युवा संकल्प चौक ते पाटील मळा व रामदेव बाबा नगराला जोडणार्या सर्व ढाप्यांची चाळण झाली असून येणार्या-जाणार्या वाहनचालकांना ढाप्यावरून वाट काढावी लागत आहे. ठिकठिकाणी साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे रस्ते पूर्ण उखडले आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात सतत वर्दळ असल्याने पादचार्यांसह दुचाकीचालक, रीक्षा चालक, वयोवृद्ध महिला व विद्यार्थ्यांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. वाहने ढाप्यात आदळतात त्यामुळे अपघातास आमंत्रण मिळते तर पाठदुखीचा त्रास वाहनचालकांना सोसावा लागत आहे. खड्डे टाळण्याचा प्रयत्नात या भागात किरकोळ अपघातही घडले आहेत. रात्रीच्या वेळेला ढाप्याचा अंदाज न आल्यामुळे अनेक वाहनचालकांचे अपघात होत आहेत. त्यामुळे वाट काढणे जिकरीचे होते. भुसावळ नगरपालिका प्रशासनाने त्वरीत सर्वेश्वर नगर, युवा संकल्प चौक, रामदेव बाबा मंदिराजवळील तसेच राजगौंड सोसायटी जवळील या सर्व चारही ढाप्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे शहराध्यक्ष निलेश कोलते यांनी केली आहे.
काम लवकरच सुरू होणार : मुख्याधिकारी
मंगळवारी सकाळी भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांची भेट घेऊन सर्व परीस्थितीची माहिती त्यांना देण्यात आली. लवकरच सर्व ढापे दुरुस्त करण्यात येतील तसेच काही ठिकाणी नूतनीकरण करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्याधिकार्यांनी यावेळी दिली.


