डाक सहाय्यकाची दुचाकी लंपास : दुचाकी चोरट्यांची टोळी सक्रिय
जळगाव : शहरातील पांडे चौकातील मुख्य पोस्ट ऑफिसच्या आवारातून डाक सहाय्यक कर्मचार्याची दुचाकी चोरीस गेली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अमळनेर येथील रहिवासी गणेश अशोक चौधरी (36) हे जळगाव शहरातील पांडे चौक परीसरात असलेल्या पोस्ट ऑफिसच्या मुख्य कार्यालयात डाक सहाय्यक म्हणून नोकरीला आहे. ते अमळनेरहून ये-जा करतात.
पार्किंगमधून दुचाकीची चोरी
शनिवार, 20 नोव्हेंबर रोजी गणेश चौधरी हे नेहमीप्रमाणे जळगावात पोस्ट कार्यालयात ड्युटीवर आले. यादरम्यान सकाळी सव्वा नऊ वाजता त्यांनी त्यांची (एम.एच 19 बी.ई.1416) या क्रमाकांची दुचाकी पोस्ट कार्यालय आवारात पार्किंगमध्ये उभी केली. दुपारी 1 वाजता कामानिमित्ताने बाहेर जाण्यासाठी कार्यालयातून बाहेर पडले असता, दुचाकी दिसून आली नाही. सर्वत्र शोध घेतला मात्र दुचाकी मिळून न आल्याने गणेश चौधरी यांनी सोमवारी त्यांची 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरीस गेल्याबाबत जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिली असून त्यावरुन अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गणेश पाटील हे करीत आहेत.

