माजी आमदार संतोष चौधरी म्हणाले : गट, तट विसरून राष्ट्रवादी वाढीसाठी कामाला लागा

भुसावळ शहरातील बैठकीत माजी आमदार संतोष चौधरी : निवडून येणार्‍यालाच मिळावी उमेदवारी


भुसावळ : आगामी काळात महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांना सोबत घेवून आपल्याला काम करावे लागणार आहे शिवाय भुसावळ शहराच्या विकासासाठी एक सोडून कुणाशीही तडजोड करण्याची आपली तयारी असल्याचे सूचक वक्तव्य माजी आमदार संतोष चौधरी यांनी येथे केले. पक्ष वाढीसाठी गट, तट व मतभेद विसरून सार्‍यांनी कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रसंगी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर व तालुका भुसावळच्या वतीने शहरातील कन्हाळा रोडवरील मोरया हॉलमध्ये शनिवारी पक्षाची बैठक झाली. प्रसंगी ते बोलत होते. यावेळी भुसावळात 5 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे होत असलेले आगमन व 12 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी सुप्रीमो शरद पवार यांच्या वाढदिवसाबाबतच्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले.

भुसावळच्या विकासासाठी एकजूट महत्वाची
माजी आमदार चौधरी म्हणाले की, शहराच्या विकासासाठी पदाधिकार्‍यांची एकजूट महत्वाची आहे. आमदार संजय सावकारे यांचा नामोल्लेख टाळून चौधरी म्हणाले की, शहराच्या विकासासाठी एक व्यक्ती सोडून कुणाशीही तडजोड करण्याची आपली तयारी असून आगामी काळात पक्ष वाढीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. उपमुख्यमंत्र्यांसमोर आपल्यातील एकजूट दिसून आल्यास भुसावळ शहराच्या विकासासाठी पाच वर्ष पुरेल एव्हढे ते देवून जातील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. काही लोक गटबाजी निर्माण करण्यासाठी ‘कलाकारी’ करतात, आम्ही मात्र कोणतेही काम छुपे करीत नाहीत, असेही ते म्हणाले. निवडून येणारा उमेदवार असावा, हा उमेदवारी देताना निकष असावा, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.



उपमुख्यमंत्र्यांच्या दौर्‍याबाबत नियोजन
भुसावळात विविध विकासकामांच्या भूमिपूजन व लोकार्पणनानिमित्त, पदाधिकार्‍यांच्या पक्ष प्रवेशानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार हे रविवार, 5 डिसेंबर रोजी शहरात येत आहेत शिवाय राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा 12 डिसेंबर रोजी वाढदिवस असल्याने त्या संदर्भात पक्षातर्फे आयोजित केल्या जाणार्‍या कार्यक्रमांबाबत तसेच नियोजनाबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

यांची होती उपस्थिती
या बैठकीला राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र भैय्या पाटील, माजी आमदार मनीष जैन, उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र चौधरी, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, भुसावळ तालुकाध्यक्ष दीपक मराठे, भुसावळ शहराध्यक्ष नितीन धांडे, भुसावळ कृउबा सभापती सचिन चौधरी, बुटासिंग चितोडीया, नगरसेवक प्रा.सुनील नेवे, पंढरीनाथ पाटील, सुधाकर जावळे, प्रा.भागवत पाटील, संगीता भामरे, महिला जिल्हा सरचिटणीस पाटील, महिला तालुकाध्यक्ष नंदा निकम, कैलास माळी, मनोज कोलते, पप्पू भाई जकातदार, तसेच तालुक्यातील सर्व सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रेम करणारे राष्ट्रवादी प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार उल्हास पगारे यांनी मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !