जळगावातील इकरा युनानी महाविद्यालयात विद्यार्थ्यांची सामूहिक रॅगींग


तिघांची तडकाफडकी हकालपट्ठी : परभणीच्या विद्यार्थ्याने केली पोलखोल

जळगाव : जळगावच्या इकरा युनानी महाविद्यालयात सिनियर विद्यार्थ्यांकडून चक्क 28 विद्यार्थ्यांची सामूहिक रॅगिंग करीत त्यांना विवस्त्र करण्यात आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली. परभणीच्या एका विद्यार्थ्याने या बाबीचा भंडाफोड करताच महाविद्यालयाने तीन विद्यार्थ्यांची तातडीने हकालपट्टी करण्यात आली आहे. मुदस्सर मुख्तार इनामदार (19, रा.परभणी) या विद्यार्थ्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.

शिवीगाळ, मारहाण करीत केले रॅगींग
मुदस्सर याने दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री दोन वाजता काही विद्यार्थ्यांना विवस्त्र करण्यास भाग पाडण्यात आले. त्यानंतर सिनेमातील पात्र, प्रियकर-प्रेयसी यांच्या प्रमाणे अ‍ॅक्टिंग करण्यास सांगून नंतर एकेक विद्यार्थ्यांची ओळख-परेड घेण्यात आली. मुदस्सर याला काही विद्यार्थ्यांनी शिवीगाळ करताच त्याने विरोध करताच तीन-चार जणांनी त्याला मारहाण केली आणि त्याच्या खिशातील मोबाईल काढून कचरापेटीत फेकला तसेच खिशातील 18 हजार रुपये हिसकावून घेतले. त्यानंतर त्याला फुंकर मारुन ट्युब लाईट विझवण्यास सांगितले, अन्यथा हीच ट्युबलाईट अंगावर फोडू, असे धमकावण्यात आले. हा त्रास असह्य झाल्यानंतर मुदस्सर याने हॉलमधून पळ काढत स्वत:ची सुटका केली तर सुरक्षा रक्षकाच्या भ्रमणध्वनीवरून पालकांशी संपर्क साधला. पालकांनी महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क साधून माहिती दिली. प्राचार्य डॉ.शोएब शेख यांनी घटनेची चौकशी केली. रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास मुदस्सरचे वडील मुख्तार इनामदार व भाऊ डॉ़ मुजक्कीर हे महाविद्यालयात पोहचले. महाविद्यालयाने घडलेला प्रकार मान्य करत दोषी असलेल्या तीन विद्यार्थ्यांची तडकाफडकी हकालपट्टी केली. दरम्यान, मुदस्सर याचा मोबाईल व रोख रक्कम काही जणांनी लांबविला. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली. मुदस्सर याने पहाटे 3.44 वाजेच्या सुमारास दिल्ली येथील अँटी रॅगिंग समितीकडे मेलव्दारे तक्रार केली. दरम्यान, समितीच्या सूचनेनंतर प्राचार्य डॉ. शेख यांनी विद्यालयाच्या कार्यालयात सर्व 28 मुलांचे लेखी जबाब नोंदवले. या प्रकाराची नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरूंकडेही तक्रार करण्यात आली.

प्रकार चुकीचा : जवाब नोंदवले -डॉ.करीम सालार
याबाबत संबंधित विद्यार्थ्याने पोलिसात व अ‍ॅन्टी रँगिंग समितीकडेही तक्रार केली असून प्राचार्यांकडून विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवून घेण्यात आले आहेत शिवाय महाविद्यालयात झालेला रॅगिंंगचा प्रकार अत्यंत चुकीचा असल्याची माहिती इकरा संस्थेचे संस्थापक डॉ.करीम सालार यांनी दिली. रॅगींग करणार्‍या
त्या तीन विद्यार्थ्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचेही ते म्हणाले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !