संच मान्यतेचे निकष निश्चिती संदर्भात शिक्षण आयुक्त सकारात्मक
भुसावळ : शासन मान्य महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरीक शिक्षण शिक्षक महासंघाच्या राज्यातील प्रतिनिधींसमवेत शिक्षण आयुक्त कार्यालय (पुणे) यांची बैठक झाली . या बैठकीत शिक्षण संचालक महेश पालकर, प्रशासन अधिकारी राजेश शिंदे यांच्यासह शिक्षण विभागातील संबंधित वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते . शालेय स्तरावरील शिक्षकांच्या पद भरती, वरीष्ठ व निवड श्रेणी अशा विविध समस्यांवर सविस्तर चर्चा झाली. संच मान्यतेचे निकष निश्चिती संदर्भात शिक्षण आयुक्तांनी सकारात्मकता दर्शवली.
दोन्ही मेथडचा विचार करावा
शालेय स्तरावर बी.एड. समकक्ष बी.पी.एड./बी.एड. (फिजी.) अर्हतेच्या शिक्षकांच्या पद भरती निश्चितीचे निकष ठरविताना बी.एड., बी.पी.एड./ बी.एड. (फिजी.) या सर्व अर्हतेत भेदभाव न करता समान दर्जा द्यावा, या अर्हतेच्या शिक्षकांना शासनाने 14 मे 1987 रोजी निर्गमित केलेल्या अध्यादेशाप्रमाणे निकष निश्चित करावेत व ही अर्हता प्राप्त करताना घेतलेल्या दोन्ही मेथडचा कार्यभार अध्यापनासाठी विचारात घेवूनच शारीरिक शिक्षण शिक्षकाची पद निश्चिती करावी, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, बैठकीत संच व वैयक्तीक मान्यता निकष या मधील सुधारणासह वरीष्ठ व निवड श्रेणी, अंशकालीन शिक्षक भरती प्रक्रिया आणि शालेय स्तरावरील सलग कार्यभारा संदर्भातील अनेक बाबींवर चर्चा झाली.
यांची बैठकीला उपस्थिती
या बैठकीस महासंघाचे राज्याध्यक्ष शरदचंद्र धारुरकर, उपाध्यक्ष आर.डी. पाटील, मिलिंद क्षिरसागर, सचिव चांगदेव पिंगळे, कार्यालयीन सचिव सुरेश मुळूख, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष आर.डी.खैरनार, सातारा जिल्हा कोषाध्यक्ष राजेंद्र माने, पुणे शहराध्यक्ष कमलाकर डोके, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अंगद गरड, सचिन दुर्गाडे, कल्याण अवसरे व इतर मान्यवर उपस्थित होते. सुमारे अडीच तास चाललेल्या या बैठकीत सर्व चर्चा सकारात्मक होवून भावी पिढीला दिशा देणारी होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला, असे महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरीक शिक्षण शिक्षक महासंघ (पुणे)चे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा ध्यक्ष डॉ.प्रदीप साखरे कळवतात.


