भाजपचे ओबीसी आरक्षणाबाबत प्रेम बेगडी : प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख
बोदवड : ओबीसी नेत्यांवर अन्याय करून आज ओबीसी आरक्षणासंदर्भात या पक्षाचे बेगडी प्रेमाचे नाटक सुरू असल्याची टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केली. शनिवारी येथील गांधी चौकात रात्री 8 वाजता शरद युवा संवाद यात्रेचे आगमन झाले. त्यावेळी सभेत ते बोलत होते. मेहबूब शेख म्हणाले की, भाजपच्या कठीण काळात पक्षाला वाढवण्यासाठी एकनाथ खडसे यांनी अपार कष्ट घेतले. पण स्व.गोपीनाथ मुंडे व एकनाथ खडसे यांची भाजपने काय अवस्था केली, हे सर्वांना माहिती आहे. कष्ट करायला हे तर पद घ्यायला दुसरे, अशी स्थिती भाजपात आहे.
शिवसेना-भाजपाचा जामनेरातून कार्यक्रम
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 81 वा वाढदिवसानिमित्त प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसने ‘चेतना या नव्या युगाची, नव्या विचारांची, प्रगतिशील महाराष्ट्राची’ ही युवा संवाद यात्रा सुरू केली आहे. येथील सभेत प्रदेशाध्यक्ष शेख यांनी तरुणांशी संवाद साधला. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवण्याचे आवाहन त्यांनी युवकांना केले. बोदवड, मुक्ताईनगर ही ऐतिहासिक भूमी आहे. येथे नुकतेच नगरपंचायतीचे निकाल लागले. त्यात पक्षाचे सात नगरसेवक निवडून देत त्यांना संधी दिली याबाबत त्यांनी मतदारांचे कौतुक केले. या निवडणुकीत शिवसेना व भाजप हे दोन्ही वेगळे लढले तरी त्यांचा सर्व कार्यक्रम जामनेरमधून झाल्याची टीका त्यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांचे नाव न घेता केली. तर आमदार चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता 2024 मध्ये ते भाजपकडून लढतील, असे सूतोवाच केले. शरद पवारांच्या विचारांचे समर्थन करून त्यांचे विचार हे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अॅड.रवींद्र पाटील, अॅड.रोहिणी खडसे, रवींद्र पाटील, सभापती किशोर गायकवाड, रामदास पाटील उपस्थित होते.


