राजकीय गुंडगिरीला भुसावळात ब्रेक लागण्याची गरज : आमदार संजय सावकारे


भुसावळ : शहरात सर्रास पिस्तुल निघत असलेतरी पोलिस अधिकारी चांगले आल्याने त्यांच्यावर कारवाईदेखील होत आहे मात्र शहराच्या राजकारणातही गुन्हेगारी वाढली असून त्यासही ब्रेक लागणे गरजेचे असल्याची भावना आमदार संजय सावकारे यांनी येथे व्यक्त केली. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शहरात शनिवारी झालेल्या विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. आमदारांच्या उपस्थितीत शनिवारी दुपारी एचडीएफसी बँकेजवळील जामनेर रस्ता कामाचा शुभारंभ करण्यात आला.

भुसावळातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेण्यासाठी अतिक्रमण हटवावे
आमदार सावकारे म्हणाले की, भुसावळ शहरातील सर्वदूर अतिक्रमण वाढले असून मुख्य रस्ते अतिक्रमणाने व्यापले आहेत त्यामुळे शहराचा नावलौकीकही त्यामुळे खराब होत असून आता प्रशासकीय राजवट असल्याने कुणाचाही राजकीय दबाव नसल्याने मुख्य रस्त्यांनी मोकळा श्वास घेणे गरजेचे आहे त्यासाठी प्रशासक व मुख्याधिकार्‍याींनी दखल घ्यावी, असे आमदार म्हणाले.



शहराचा विकास रखडला, रस्ता कामे संथगतीने
शहराचा अपेक्षित विकास झाला नसल्याचे सांगून आमदार म्हणाले की, आता विकासाची शहरवासीयांना अपेक्षा आहे त्यासाठी नागरीकांनी चांगल्या लोकप्रतिनिधींना निवडून देण्याची जवाबदारी आहे. अमृत योजनेचे काम संथगतीने सुरू असल्याने त्याबाबत बैठक लावावी, अशी विनंती त्यांनी पालकमंत्र्यांना केली. पालकमंत्री पक्ष भेद न करता कामे करीत असून खर्‍या अर्थाने ते पालकमंत्री असल्याचा गौरवही त्यांनी केला.

रस्त्यावर खुर्ची टाकून बसलो म्हणजे आपणच काम केले नव्हे !
जामनेर रस्त्याचे काम नाशिकच्या कंपनीला मिळालेले असून ई टेंडर प्रक्रियेनुसार लोव्हेस्ट निविदा त्यांनी भरल्याने त्यांना काम मिळाले आहे मात्र काही लोक खुर्ची टाकून तेथे बसून, आम्हीच काम केले असे दाखवत असतील तर ते चुकीचे असल्याचा टोला आमदारांनी हाणला. ते म्हणाले की, आपण स्वतः या रस्त्याचे काम होण्यासंदर्भात पत्र पालकमंत्र्यांना दिले होते व त्याबाबत डीपीडीसीत पाठपुरावा केल्यानंतर हे काम मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर आमदार संजय सावकारे, प्रशासक तथा प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, माजी नगराध्यक्ष रमण भोळे, जिल्हाप्रमुख समाधान महाजन, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, विश्वनाथ पाटील आदी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !