तोतया पोलिसांना यावल पोलिसांनी केली अटक

वृद्धास लुटल्याप्रकरणी दाखल आहे गुन्हा : अटकेपूर्वी आरोपींचा हायव्होल्टेज ड्रामा


यावल : तालुक्यातील पाडळसे येथील एका 68 वर्षीय वृध्दास 13 जानेवारी रोजी सकाळी दोन अज्ञात भामट्यांनी पोलिस असल्याचे सांगत वयोवृद्धाकडील 40 हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी व इतर ऐवज लांबवून पोबारा केला होता. या प्रकरणात शिरपूर येथून दोघा तोतया पोलिसांना यावल पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. दोघांची ओळख परेड करण्यात येणार असल्याने पोलिस कस्टडी राखून ठेवत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. दरम्यान, आरोपींना यावल पोलिस ताब्यात घेणार असल्याची कुणकुण लागताच त्यांनी केलेला हायव्होल्टेज ड्रामा शिरपूरात चर्चेचा विषय ठरला. जावेद अली नौशाद अली (43, मुस्लीम कॉलनी, खडका रोड, भुसावळ) व जफर हुसेन उर्फ इज्जत हुसेन (39, शिवाजीनगर, रेल्वे पोलीस कॉलनी परळी, जि.बीड) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

यावलमध्ये वृद्धाची केली फसवणूक
पाडळसे, ता.यावल येथील दिलीप पुरुषोत्तम बर्‍हाटे (68) हे 13 जानेवारी रोजी सकाळी दुचाकी (क्रमांक एम.एच.03 ए.पी.1608) भुसावळमार्गे यावल येथे येत असताना शहराजवळील घोडेपीर बाबा दर्ग्याजवळ सकाळी दहा वाजेच्या सुमारास त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी जळगावातील पोलिस असल्याचे सांगत तुमच्याकडे गांजा असल्याचा आम्हाला संशय सांगत बर्‍हाटे यांच्या दुचाकीवरच त्यांची अंग झडती घेतली व दरम्यान हातातील 40 हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढुन घेतली व भुसावळच्या दिशेने पळ काढला. या प्रकरणी बर्‍हाटे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शिरपूरात आरोपींचा हायव्होल्टेज ड्रामा
शिरपूरातील करवंद नाका परीसरात 9 फेब्रुवारी रोजी दोघा आरोपींनी पोलिस असल्याचे सांगत वृद्धाची फसवणूक केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघा संशयीतांना धुळे एलसीबीने अटक करीत शिरपूर पोलिसांच्या ताब्यात दिले होते. आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावल्यानंतर 21 रोजी आरोपींना जामीन मंजूर करताच यावल पोलिसांनी यावलच्या गुन्ह्यात अटक केली मात्र तत्पूर्वीच आरोपींनी ड्रामा केला. आरोपी जावेद अली याने तोंडातून लाळ बाहेर फेकत धापा टाकून श्वास अडकत असल्याचा बेशुद्ध झाल्याचा देखावा केला व अन्य महिलांनी आक्रोश केला. संशयीतांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी संशयीतांना काहीही झाले नसल्याचे सांगितल्यानंतर त्यांना यावल पोलिसांनी ताब्यात घेतले. यावल पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, सहायक फौजदार मुजफ्फर खान, नेताजी वंजारी, संदीप सूर्यवंशी, अशोक बाविस्कर आदींनी दोघांना ताब्यात घेतले. पुढील तपास पोलिस निरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !