भुसावळातील अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरूवात
आजपासून पालिकेची तीन दिवस मोहिम : व्यावसायीकांनी अनेक भागात स्वतःहून हटवले अतिक्रमण
भुसावळ : शहरातील सर्वच भागात वाढलेल्या अतिक्रमणाच्या तक्रारीनंतर प्रशासक राजवटीत अतिक्रमण हटाव मोहिमेला गुरुवारपासून मुहूर्त गवसला व प्रत्यक्षात पहिल्याच दिवशी जळगाव रोडसह यावल रोडवरील 160 अतिक्रमणावर पालिकेने जेसीबी फिरवल्याने अतिक्रमण करणार्यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी दहापासून प्रचंड पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्यात आल्याने अनेक वर्षानंतर रस्त्यांना मोकळा श्वास घेतल्याचे दिसून आले. दरम्यान, शुक्रवारी शहरात अतिक्रमण हटाव मोहिम बंद राहणार असून शनिवारी मात्र खडका रोडसह उर्वरीत भागातील अतिक्रमण हटवण्यात येणार आहे. दरम्यान, जेसीबी मशीनवर चढलेला पालिकेचा कर्मचारी वसूली लिपिक सुनील इंगळे यांचा पाय घसरून पडल्याने जखमी झाला आहे.
अनेकांनी स्वतःहून काढले अतिक्रमण
वर्दळीच्या रस्त्यावरील चहाच्या टपर्या, पान टपरी, गॅरेजच्या टपर्या, नाश्ता सेंटर, वडापाव, भाजीपाला, मासोळी विक्रेत्यांनी दुकाने थाटली मात्र अतिक्रमण हटाव मोहिम गुरुवारी राबवली जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी बुधवारी रात्रीच अतिक्रमण केलेल्या ठिकाणावरून टपर्या हलवल्या तर ज्या व्यावसायीकांनी अतिक्रमण हटवले नाही त्यांच्यावर गुरुवारच्या मोहिमेत कारवाई करण्यात आली. गुरुवारी सकाळी 10 वाजता जळगाव रोडवरील लोणारी समाज मंगल कार्यालयापासून अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली. सरदार वल्लभभाई पटेल याच्या पुतळ्या पुढील व्यापारी संकुलातील काही व्यावसायीकांनी पुढे शेड तयार केले होते, ते शेड सुध्दा पालिकेच्या पथकाने जेसीबीच्या सहाय्याने काढले.


न्यायालयाच्या बाहेरील फुथपाथ मोकळा
अतिक्रमण पथकाने न्यायालयाच्या बाहेर असलेल्या फुथपाथवर वेंडरांनी लावलेले पाल सोडले. काही जणांनी केलेले तेथील अतिक्रमण सुध्दा काढून टाकले. तर पंचायत समितीजवळील हॉटेलच्या बाहेरील शेडही मोडून काढले. या मार्गावरील तात्पुरते केलेले अतिक्रमण सुध्दा पथकाने काढले. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त तेथे होता. यावेळी मुख्याधिकारी संदीप चिद्रवार स्वतः उपस्थित होते.
लोकप्रतिनिधी मात्र झाले गायब
अतिक्रमण काढत असतांना त्या-त्या परीसरातील कुणीही नगरसेवक दिसून आल्याने व्यावसायीकांमध्ये या बाबीविषयी मोठा रोष दिसून आला. दरम्यान, तार ऑफिस रस्त्यावर अतिक्रमण काढण्यास गेलेल्या पथकाने तेथील दोन दुकानांजवळ अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न केल्यानंतर संबंधिताने आमच्याजवळ कागदपत्रे असल्याचे सांगितले मात्र मुख्याधिकारी यांनी कागदपत्रे दाखवा, असा पावित्रा घेतला मात्र कागदपत्रे सादर करू न शकल्याने पालिकेने अखेर कारवाई केली.
जगन सोनवणेंसह दोघे ताब्यात
अतिक्रमण हटाव मोहिम राबवू नये म्हणून संविधान आर्मीचे संस्थापक जगन सोनवणे व राकेश बग्गन यांनी विरोध केला मात्र याचवेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिस व्हॅनमध्ये बसवित त्यांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले.
