धनगर समाज आरक्षणासह समाजातील प्रश्न सोडवावेत
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने घेतली भेट
रावेर : रावेर तालुक्यातील धनगर समाजाच्या प्रश्नांसाठी संदीप सावळे यांनी राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत शिष्टमंडळासह भेट घेत आगामी अधिवेशनात धनगर आरक्षण संदर्भात आवाज उठवण्याची मागणी केली. यावेळी त्यांच्यासोबत राज्यभरातील धनगर समाजाच्या प्रतिनिधी उपस्थित होते.
विविध प्रश्नांविषयी चर्चा
मुंबईत धनगर समाजातील प्रलंबित प्रश्नासाठी रावेर पंचायत समितीच्या उपसभापती धनश्री सावळे यांचे पती धनगर नेते संदीप सावळे यांनी मुंबईत जाऊन राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी आरक्षणाबाबत धनगर समाजाचे प्रश्न विधानसभेत उचलण्याची मागणी केली तसेच भाजपा सरकार असतांना धनगर समाजाच्या विकासासाठी दिलेले एक हजार करोडमधील महाविकास आघाडी सरकारने एक दमडी सुध्दा दिली नाही यावर सुध्दा आवाज उचलण्याची मागणी धनगर समाजाच्या प्रतिनिधींनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. यावेळी उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्वर पाटील यांच्यासह महाराष्ट्रातील धनगर समाजाचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.


