दिशा सालियन मृत्यू प्रकरण ; मंत्री नारायण राणेंसह पूत्र नितेश राणेंची पोलिसांकडून कसून चौकशी
मालवणी पोलिस ठाण्यात 9 तास जबाब नोंदवला
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्यांचे आमदार पुत्र नितेश यांनी शनिवारी मालवणी पोलिस ठाण्यात हजेरी लावल्यानंतर पोलिसांनी तब्बल दोघांची नऊ तास चौकशी करीत जवाब नोंदवला. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी केलेल्या वक्तव्या प्रकरणी ही चौकशी करण्यात आली
दिशावर अत्याचार झाल्याचा केला होता दावा
दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची व्यवस्थापक असताना 8 जून 2020 रोजी दिशाने आत्महत्या केली. दिशाचा मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगून मृत्यूपूर्वी ती गरोदर होती आणि तिच्यावर अत्याचार झाल्याचा दावा केंद्रीय मंत्री राणे यांनी 19 फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेत केला होता. या वेळी नितेशही उपस्थित होते. मात्र, शवविच्छेदन अहवालात दिशावर अत्याचार झाल्याचा अथवा गरोदर असल्याचा उल्लेख नाही त्यामुळे दिशाच्या मृत्यूनंतर तरी तिच्या अब्रूचे जाहीर धिंडवडे काढू नका, असे आवाहन सालियन कुटुंबीयांनी केले होते.


राज्य महिला आयोगाचीही तक्रार
राज्य महिला आयोगानेही राणे पिता-पुत्रांच्या सोशल मीडियावरील दाव्यांबद्दल मालवणी पोलिसांत तक्रार केली होती. यानंतर दिशाची बदनामी केल्याप्रकरणी तिची आई वासंती सालियन यांनी राणे पिता-पुत्रांविरुद्ध तक्रार केली. यावर मालवणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून राणे पिता-पुत्रांना नोटीस बजावली होती.
नऊ तास पिता-पूत्रांची चौकशी
मालवणी पोलिसांच्या नोटिसीवरून शनिवारी दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास नारायण राणे आणि नितेश राणे पोलिस ठाण्यात हजर झाले. तपास अधिकार्यांसमोर पिता-पुत्रांचा जबाब नोंदवण्याचे काम सुरू झाले. रात्री 9 वाजेपर्यंत ते पोलिस ठाण्यातच होते. दरम्यान, अटकेच्या भीतीने राणे पिता-पुत्रांनी दिंडोशी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. न्यायालयाने त्यांना 10 मार्चपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे.
