महागाईचा पुन्हा आगडोंब : निवडणुका संपताच पेट्रोलचे डिझेलच्या दरात अशी झाली वाढ
जळगाव : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे पुन्हा इंधन दराचा भडका उडाला आहे. देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल करण्यात आले आहेत. मंगळवारी देशभरातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नसलातरी चेन्नईत इंधन दरात किंचित वाढ झाली. दरम्यान, बुधवारी जळगावमध्ये एका लिटर पेट्रोलचा दर 111.29 रुपये इतका आहे. तर डिझेलचा 94.20 रुपये प्रति लिटर इतका होता. आगामी काळात इंधन दराचा भडका उडण्याची चिन्हे आहेत.
कच्च्या तेलाचे भाव वधारले
रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव सार्वकालिक उच्चांकी पातळीवर पोहोचले असतानाही भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाच्या दरात वाढ केली नव्हती मात्र पाच राज्यांच्या निवडणुका संपल्यामुळे देशभरात इंधनाचे दर सुस्साट वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, आज सोमवारी पेट्रोलियम कंपन्यांनी सलग 123 व्या दिवशी प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल डिझेल दर जैसे थे ठेवले आहेत.




या शहरात सर्वाधिक स्वस्त दरात इंधन
आज जाहीर झालेल्या नवीन दरानुसार, देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये 82.96 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे, तर डिझेलही येथे 77.13 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. त्याच वेळी, महानगरांमध्ये, मुंबईत पेट्रोल सर्वात महाग आहे 109.98 रुपये आणि दिल्लीमध्ये सर्वात स्वस्त आहे 95.41 रुपये. त्याचवेळी भापाळ, जयपूर, पाटणा, कोलकाता, चेन्नई आणि बंगळुरूमध्ये पेट्रोल 100 च्या पुढे आहे.
किती वाढू शकतात पेट्रोल आणि डिझेलचे दर
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 25 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे गेल्या चार महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झालेली नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबरच्या सुरुवातीला जेव्हा पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत शेवटचा बदल करण्यात आला, तेव्हा कच्च्या तेलाची सरासरी किंमत प्रति बॅरल 81.5 डॉलर होती. आता ती 130 डॉलरच्या पुढे गेली आहे. म्हणजेच, आतापर्यंत त्याची किंमत सुमारे 50 डॉलरने वाढली आहे.