बोदवड नगरपंचायतीच्या विविध विषय समित्यांवर शिवसेनेचे वर्चस्व
भाजपचे एकमेव नगरसेवक विजय बडगुजर यांची बांधकाम सभापतीपदी निवड
बोदवड : शहरातील नगरपंचायतीच्या विविध विषय समित्यांची निवड सोमवारी झाली तर विविध विषय समित्यांवर शिवसेनेने वर्चस्व मिळवले तसेच भाजपाच्या एकमेव नगरसेवकाची बांधकाम समितीच्या सभापती निवड करण्यात आली. दरम्यान, भाजपाकडून निवडून आलेले मात्र शिवसेनेला पाठिंबा देणारे विजुशेठ बडगुजर यांची सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापती पदावर वर्णी लागली. सर्व विषय समित्यांचे सभापती हे स्थायी समितीचे सदस्य तर नगराध्यक्ष हे अध्यक्ष राहणार आहेत.
असे आहेत विषय समिती सभापती
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आदेशानुसार पीठासीन अधिकारी तहसिलदार योगेश्वर टोंपे, मुख्याधिकारी आकाश डोईफोडे व कार्यालयीन अधिक्षक राजुसिंग चव्हाण यांच्या उपस्थितीत सोमवारी निवड प्रक्रिया झाली. महिला व बालकल्याण सभापतीपती उपनगराध्यक्षा रेखा गायकवाड तर सार्वजनिक बांधकाम समिती सभापतीपदी विजय शिवराम बडगुजर यांची निवड करण्यात आली. पाणीपुरवठा सभापती बेबीबाई विनोद माळी तर स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य सभापतीपदी पूजा प्रीतेश जैन यांची निवड करण्यात आली.


विरोधी गट सभापतीपासून मुकला
महाराष्ट्र नगरपरीषदा, नगरपंचायत औद्योगिक नगरी अधिनियम 1965 नुसार कलम 65 (3) अन्वये विषय समितीमध्ये पाच पेक्षा अधिक सदस्य राहणार नाही त्यामुळे शिवसेनेचे 09 व समर्थक 01 नगरसेवकांचे 03 विषय समित्यांत सभापती निवडीसाठी स्पष्ट बहुमत मिळाले तर अधिनियमान्वये कलम 4 (ब) 5 नुसार उप नगराध्यक्ष पदाचा व्यक्ती ज्या विषय समितीचा पदसिद्ध सभापती होणार असेल त्या समितीची निवड सदस्यांकडून होत नाही. त्यामुळे उपनगराध्यक्ष रेखा गायकवाड यांना या समितीचे सभापती पद मिळाल्याने विरोधी राष्ट्रवादी गटाला आशा असलेल्या एकमेव सभापती पदापासून मुकावे लागले त्यामुळे शिवसेनेच्या डावपेचामुळे हा दिग्गजांना झटका असल्याची चर्चा होत आहे.
