पालिका निवडणुका पुढे ढकलल्या : भुसावळात इच्छुकांच्या स्वप्नांवर पुन्हा फेरले पाणी


भुसावळ : पालिका निवडणुकीसाठी 10 मार्चला प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली. त्यावर हरकतींची प्रक्रिया देखील सुरू होती. राज्य शासनाने प्रभागाच्या सीमा निश्चित करण्याबाबतचा नवीन अधिनियम मंजूर केला. यामुळे राज्य निवडणूक आयोगाने शासनाच्या नवीन अधिनियम तरतुदीनुसार प्रभाग रचनेचे निर्देश दिले आहे. परीणामी 10 मार्चला जाहीर झालेली प्रभाग रचना रद्द झाली. यामुळे पालिका निवडणूक देखील पुढे लोटली गेल्याने शहरातील इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले आहे.

प्रशासकीय राजवटीचा कालावधी वाढणार
राज्य सरकारचा नवीन कायदा व ओबीसी आरक्षणाविना निवडणूक घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे निवडणुकीबाबत अद्याप गोंधळ होता. नंतर राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील प्रभाग रचना, प्रभागाच्या सीमा निश्चितीचा अधिकाराबाबत कायदा केला. यामुळे 10 मार्चला जाहीर झालेली प्रभाग रचना रद्द झाली. भुसावळ पालिकेचा कार्यकाळ डिसेंबर 2021 मध्ये संपला. यानंतर पालिकेवर प्रशासक म्हणून प्रांत रामसिंग सुलाणे यांची वर्णी लागली. नवीन निर्णयानुसार निवडणूक पुढे लोटली जाऊन पालिकेवरील प्रशासकीय राजवट वाढणार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !