राज्याच्या मागगुटीवर भारनियमनाचे भूत : ए ग्रुपवर दीड तास तर जी-3 गुपवर पाच तासांचे भारनियमन
भारनियमनाच्या व्यतिरीक्त मागणी वाढल्यास इमरजन्सी लोडशेडींग
भुसावळ : राज्यात महानिर्मितीच्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमध्ये निर्माण झालेली कोळशाचा तुटवडा, उन्हाळ्यात घरगुती, कृषी क्षेत्रातून वाढलेल्या वीज वापरामुळे महावितरणने गुरुवारपासून राज्यभरात ए ते जी-3 या डीसीएल ग्रुपवर नियोजीत भारनियमन सुरू केले आहे. ए ग्रुपवर किमान दीड तास तर जी -3 या ग्रुपवर पाच तासांचे भारनियमन सुरु करण्यात आले आहे. या भारनियमनासोबतच राज्यात अचानक मागणी वाढल्यास इमरजन्सी (आपत्कालीन) भारनियमन देखील केले जाणार आहे. यामुळे गेल्या काही वर्षांपाासून भारनियमनमुक्त असलेल्या राज्याच्या मानगुटीवर पुन्हा भारनियमनाचे भुत चढले आहे.
आपत्कालीन होणार भारनियमन
राज्याला मिळणार्या वीजपुरवठ्यात सर्वाधिक वाटा असलेल्या महानिर्मितीच्या सातही औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांना कोळशाची टंचाई कायम आहे. याच काळात राज्यातील तापमानाचा पारा वाढून कृषी व घरगुती क्षेत्रातील वीजेची मागणी वाढली आहे. महानिर्मितीची मागणी 23 हजार 500 तर राज्याची मागणी 27 हजार मेगावॅटपेक्षा अधिक आहे. या तुलनेत महानिर्मिती व खासगी क्षेत्रातून विजेची खरेदी करुनही किमान दोन हजार 2200 मेगावॅट विजेची तूट कायम आहे. गेल्या आठवड्यापासून राज्यातील घरगुती वीज जोडणीवरील आपत्कालीन व कृषी वीज जोडणीचे भारनियमन कमी करण्यात आले होते. मात्र आता महावितरणने प्लॅन (नियोजीत) लोडशेडींग सुरु केले आहे. गुरुवारपासून राज्यभरात याची अंमजलबावणी सुरु झाली. नियोजीत भारनियमना व्यतिरिक्त विजेची मागणी वाढल्यास आपत्कालीन भारनियम देखील केले जाणार आहे. विजेची हानी कमी व थकबाकी वसूलीच्या प्रमाण समाधानकारक असलेल्या ए गुपवर रविवार ते शनिवार दररोज दीड तास तर सर्वाधिक गळती व वसूलीचे प्रमाण अत्यल्प असलेल्या जी -3 या ग्रुपवर रविवार ते शनिवार दरम्यान दररोज पाच तास भारनियमन होणार आहे. या संदर्भात महावितरणने 18 एप्रिलला आदेश काढले होते तर गुरुवारपासून राज्यभरात ही अंमलबजावणी सुरू झाल्याचे महावितरणच्या सुत्रांनी सांगितले.

या जोडणीवर भारनियमन नाही
राज्यभरातील औद्योगिक वसाहती तसेच औद्यागिक फिडर असलेला भागात भारनियमन होणार नाही. यासोबतच एक्सप्रेस फिडर, पाणीपुरवठा योजनांवरील वीजजोडणी, आयटी पार्क अशा उपयुक्त फिडरवर भारनियमन केले जाणार नाही. या फिडरवर आपत्कालीन भारनियमन देखील होणार नसल्याचे महावितरणने काढलेल्या आदेशात नमुद केले आहे.
कोळशाची स्थिती पून्हा बिकट
महानिर्मितीला सातही केंद्रातून पूर्ण क्षमतेने (10 हजार 170 मेगावॅट) वीजनिर्मिती करण्यासाठी दररोज किमान 1 लाख 30 ते 40 हजार मेट्रीक टन कोळसा लागतो. मात्र सध्या दररोज 80 हजार टन कोळसा उपलब्ध होत आहे. महानिर्मितीकडे गुरुवारी (दि.21) 15 लाखांऐवजी केवळ 5 लाख 98 हजार 54 टन कोळसासाठा होता. गेल्या आठवड्यापासून साठा दररोज कमी होत आहे. गेल्या आठवड्यात साठा 6 लाख 27 हजार टनांपेक्षा अधिक होता.
नाशिक, भुसावळला अत्यल्प
महानिर्मितीच्या नाशिक, भुसावळ औष्णिक केंद्रांना एक दिवस पुरेल इतकाही साठा गुरुवारी शिल्लक नव्हता. नाशिकला4472 तर भुसावळला 14 हजार 930 मेट्रीक टन साठा आहे. यासोबतच कोरोडीत 3.29, परळीत 3.32 पारसला 2.72, चंद्रपूर महाऔष्णिक केंद्रात 5.78, खापरखेडा केंद्रात 4.55 दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक आहे.
असे होईल लोडशेडींग
ग्रुप —– डीसीएल गळती (टक्के) —– भारनियमनाचे तास
ए —– 0 ते 18 —– 1.30
बी —- 18 ते 26 —– 2.00
सी —- 16 ते 34 —- 2.30
डी —- 34 ते 42 —- 3.00
ई —- 42 ते 50 —- 3.30
एफ —- 50 ते 58 — 4.00
जी 1 — 58 ते 66 — 4.15
जी 2 —- 66 ते 74 —- 4.30
जी 3 —- 74 पेक्षा अधिक — 5.00