50 हजारांची लाच भोवली : नशिराबाद मंडळाधिकार्‍यासह दोघे एसीबीच्या जाळ्यात


Bribe of ₹50,000 Proves Costly : Two, Including Nashirabad Mandal Officer, Caught in ACB Trap भुसावळ (13 मे 2026) : तक्रार अर्जाची चौकशी बंद करण्यासाठी तडजोडीअंती 50 हजारांची लाच स्वीकारताना नशिराबाद मंडळ अधिकारी मिलिंद प्रकाश देवरे (37) व खाजगी पंटर सुरेश प्रल्हाद अहिरे (39, विद्यानगर, पिंप्राळा, जळगाव) यांना नाशिक एसीबीने अटक केल्याने महसूल वर्तुळातील लाचखोर हादरले आहेत. हा सापळा 12 रोजी यशस्वी करण्यात आला तर आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

असे आहे लाच प्रकरण
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या शेतीत अवैधरित्या खोदकाम सुरू असल्याबाबत काही स्थानिक रहिवाशांनी तहसील कार्यालयात तक्रार अर्ज दिला होता. या अर्जाच्या चौकशीची जबाबदारी मंडळ अधिकारी देवरे यांच्याकडे होती. चौकशीदरम्यान संबंधित अर्ज बंद करण्यासह पुढील कारवाई टाळण्यासाठी देवरे यांनी तक्रारदाराकडे सुमारे एक लाखांची लाच मागितली मात्र वास्तविक तक्रारदाराविरुद्ध करण्यात आलेले अर्ज नंतर मागे घेण्यात आलेले होते. 50 हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर तक्रारदाराने नाशिक एसीबीकडे तक्रार दिली.







लाचखोर एसीबीच्या जाळ्यात
12 मे रोजी मंडळ अधिकारी देवरे यांनी तक्रारदाराला लाचेची रक्कम खासगी इसम सुरेश अहिरे याच्याकडे देण्यास सांगितले होते. त्याच क्षणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पूर्वनियोजित सापळा रचून पिंप्राळा येथील तलाठी कार्यालय परिसरात कारवाई करीत दोघांना अटक केली.

यांनी केला सापळा यशस्वी
ही कारवाई नाशिक परिक्षेत्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार नाईक यांच्या नेतृत्वात पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रफुल्ल माळी, विलास निकम आदींनी यशस्वी केला. या गुन्ह्याचा तपास जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत नागरे करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !