नीट पेपर फुटीची नाशिक ते हरियाणा साखळी : क्राईम ब्रांच युनिट दोनने शुभम खैरनारला केली नाट्यमयरित्या अटक


NEET Paper Leak Racket Spanning from Nashik to Haryana: Crime Branch Unit 2 Dramatically Arrests Shubham Khairnar नाशिक (12 मे 2026) : देशभरात खळबळ उडवून देणार्‍या नीट परीक्षेतील पेपर फुटी प्रकरणात नाशिकच्या क्राईम ब्राँच युनिट दोनच्या पथकाने मोठी कामगिरी केली आहे. नाशिकमध्येच नीट परीक्षेचा पहिला पेपर फुटला व येथून पहिली प्रश्नपत्रिका बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात 30 वर्षीय संशयित शुभम खैरनार याला अत्यंत नाट्यमयरीत्या बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे आरोपीने ओळख उघड न होण्यासाठी चक्क टक्कल केले मात्र पोलिसांच्या नजरेतून आरोपी सुटला नाही.

तांत्रिक माहितीद्वारे आरोपी जाळ्यात
राजस्थान सीबीआय आणि पोलिसांनी दिलेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नाशिक गुन्हे शाखा युनिट 2 ने ही कारवाई केली. शुभम खैरनार हा मूळचा नांदगावचा रहिवासी असून तो नाशिकमध्ये बी.ए.एम.एस. च्या शेवटच्या वर्षात शिक्षण घत असल्याची माहिती आहे. तपासादरम्यान पोलिसांना आरोपीचे नाव मिळाले होते मात्र पत्ता नव्हता. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याचा मागोवा घेतला.







टक्कल करीत कपडेही बदलले
पोलिसांपासून वाचण्यासाठी शुभमने चक्क आपले संपूर्ण केस कापून टक्कल केले होते आणि कपडेही बदलले होते. मंगळवारी तो देवदर्शनासाठी जात असताना पोलिसांनी रस्त्यातच सापळा रचला. सुरुवातीला नवीन ‘लूक’मुळे तो ओळखू आला नाही, मात्र पोलीस अंमलदारांनी त्याला शिताफीने ओळखले आणि अवघ्या एक तासात त्याला ताब्यात घेतले. 1 मे रोजीच हा पेपर फुटला होता. शुभम खैरनारने 10 लाख रुपयांना ही प्रश्नपत्रिका विकत घेतली आणि ती पुढे 15 लाख रुपयांना विकल्याचा संशय आहे. या व्यवहारानंतर ही प्रश्नपत्रिका इन्स्टाग्रामवर लीक झाली आणि 22 लाख विद्यार्थ्यांचे कष्ट वाया गेले.

नाशिक ते हरियाणा प्रवास
नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची पहिली कॉपी नाशिकमध्ये लीक झाली, तिथून ती हरियाणात पोहोचली. हरियाणात या पेपरचे 10 संच तयार करण्यात आले आणि त्यानंतर बिहार, आंध्र प्रदेश, जम्मू-काश्मीरपर्यंत ही साखळी पसरली. या प्रकरणात आतापर्यंत देशभरातून 16 जणांना ताब्यात घेण्यात आले असून राजस्थानचा मनीष हा या कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचे मानले जात आहे.

विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने 3 मे रोजी झालेली परीक्षा रद्द केली असून नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र तेच राहणार असून त्यांना नवीन हॉल तिकीट दिले जाईल मात्र एका मोजक्या लोकांच्या हव्यासापोटी लाखो विद्यार्थ्यांवर पुन्हा परीक्षेला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !