मुक्ताईनगरवासीयांचे आरोग्य धोक्यात : औद्योगिक वसाहतीतील टाकाऊ रसायने गटारीद्वारे पूर्णा पात्रात

नगरपंचायतीचे पाणीपुरवठा सभापती मुकेशचंद्र वानखेडे यांची जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार


मुक्ताईनगर : मुक्ताईनगर शहराजवळच असलेल्या पूर्णा नदीपात्रातून पाणीपुरवठा होत असलातरी नदीपात्रात मलकापूर तालुक्यातील दसरखेड औद्योगिक वसाहतीतील टाकाऊ रसायणे गटारीद्वारे पूर्णा नदी पात्रात सोडले जात असल्याने या बाबीमुळे मुक्ताईनगरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी नगरपंचायतीचे पाणीपुरवठा सभापती मुकेशचंद्र वानखेडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

आरोग्य धोक्यात येण्याची भीती
मुक्ताईनगर शहराला लागून पूर्णा नदी असून नदीपात्रातून मुक्ताईनगर शहराला पाणीपुरवठा होतो मात्र पाणीपुरवठा होत असलेले जलशुद्धिकरण केंद्र कालबाह्य असून पूर्णा नदीत मोठ्या प्रमाणात गाळ वाहुन येतो. जलशुद्धीकरणासाठी वेळ लागत असल्याने मुक्ताईनगरवासीयांना गाळयुक्त पाणी पिण्याची वेळ आली आहे. त्यातच मलकापुर तालुक्यातील दसरखेड औद्यौगिक वसाहतीमधील कारखान्यातील टाकाऊ रासायनिक द्रव्ये गटारीद्वारे पूर्णा नदीत सोडले जातात. नदीजवळच वनविभागाचा परीसर असून रासायनिक द्रव्यामुळे वन्य प्राण्यांना धोका निर्माण झाला आहे. यामुळे नदीपात्रातील पाणी दूषित होत असून दुर्गंधीयुक्त व तेलकट थराचा पाणीपुरवठा मुक्ताईनगर वासीयांना होत असल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशीची मागणी पाणीपुरवठा सभापती वानखेडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.


तक्रारींना नगरपंचायतीची केराची टोपली
मुक्ताईनगरवासीयांना दरवर्षी पावसाळ्यात गाळयुक्त पाणीपुरवठा होत असतो. गाळामुळे जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याची मोटार जळाल्याचे प्रकार नेहमी घडतात. यामुळे आठ-दहा दिवस मुक्ताईनगरातील पाणीपुरवठा ठप्प होतो. यासाठी गतवर्षी 15 एप्रिल 2021 रोजी नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत पाणीपुरवठा सभापती मुकेश वानखेडे यांनी पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी व योग्य आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी मुख्याधिकारी यांच्याकडे मागणी केली होती. याला अनुमोदक म्हणून माजी नगरसेवक निलेश शिरसाट आहेत.
एक वर्षांचा कालावधी लोटला तरी नगरपंचायत प्रशासनाने मुक्ताईनगरवासीयांचे जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या शुद्ध पाणीपुरवठ्याकडे दुर्लक्ष केले आहे तर पुन्हा 11 एप्रिल 2022 रोजी हीच मागणी वानखेडे यांनी केली आहे. 45 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर असलीतरी ही योजना पुर्ण होईपावेतो मुक्ताईनगरवासीयांना शुद्ध पाणीपुरवठा मिळावा, अशी रास्त मागणी होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !